भारताने पाठवलेलं चांद्रयान-३ काल (२४ ऑगस्ट) चंद्रावर उतरलं. विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं. भारताच्या इस्रो या आंतराळ संशोधन संस्थेने अनेक अडणींवर मात करून इथवरचा प्रवास केला आहे. चंद्रावर आपलं यान उतरवून भारताने एलिट स्पेस क्लबमध्ये स्थान मिळवलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळयान उतरवणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. चंद्राच्या प्रष्ठभागावर अंतराळयान उतरवण्याचा भारताचा हा तिसरा प्रयत्न होता. २०१९ मध्ये भारताने चांद्रयान-२ हे अंतराळयान चंद्रावर पाठवलं होतं. परंतु, आपण ते यान यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवू शकलो नाही. लँडिंगच्या वेळी लँडर क्रॅश झाल्याने आपल्याला आंशिक अपयश आलं. परंतु, हे अपयश मागे टाकत, आधीच्या चुकांमधून धडे घेत भारताने गेल्या महिन्यात तिसरं यान चंद्रावर पाठवलं आणि काल ते यशस्वीपणे चंद्रावर उतरवलं.
इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले, चांद्रयान-२ ने हार्ड लँडिंग केलं होतं. त्यामुळे आपण त्या मोहिमेतून काहीच रिकव्हर करू शकलो नाही. परिणामी आपल्याला पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागली. चांद्रयान-२ या मोहिमेत आपण काय चुका केल्या होत्या, त्या शोधण्यात एक वर्ष गेलं. त्यानंतर नव्याने सुरुवात केली. गेल्या दोन वर्षांत आम्ही अनेक चाचण्या घेतल्या. कोरोना काळात आमच्या आंतराळ संशोधनाला मोठा फटका बसला होता. जवळजवळ आमचं काम थांबलंच होतं.
आतापर्यंत कोणतंही चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करू शकलं नाही. दक्षिण ध्रुव हा विषुववृत्तीय प्रदेशापासून दूर आहे. हा भाग मोठे खड्डे आणि खोल खंदकांनी भरलेला आहे. दक्षिण ध्रुवावर सपाट पृष्ठभाग शोधणं अवघड आहे असं एस. सोमनाथ म्हणाले. ते एनडीटीव्हीशी बोलत होते.
हे ही वाचा >> Chandrayaan 3 : मोहिमेवरील खर्च किती? लँडिंगनंतर पुढे काय? जाणून घ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं
इस्रोचे अध्यक्ष म्हणाले, आता पुढचे १४ दिवस महत्त्वाचे असणार आहेत. आपला सहा चाकी रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल, वेगवेगळे प्रयोग केले जातील. चंद्रावरील एक दिवस हा पृथ्वीवरील १४ दिवसांच्या बरोबरीचा असतो. तिथे वेगवेगळी कामं करण्यासाठी, संशोधनासाठी लँडरबरोबर पाच पेलोड पाठवले आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी आणि खनिजे असण्याची शक्यता आहे. आपला रोव्हर त्यासंबंधीचं संशोधन करेल. या प्रमुख संशोधनासाठी आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान पाठवलं आहे.