ISRO Chief S. Somnath Autobiography : इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी त्यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन रद्द केलं आहे. या आत्मचरित्रात इस्रोचे माजी अध्यक्ष के. सिवन यांच्याबाबत कथित टिप्पणी केली असल्याचा दावा करून वाद निर्माण झाला होता. मात्र, आता त्यांनी प्रकाशन रद्द केलं असल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे.
चांद्रयान ३ मोहिमेच्या यशस्वीतेनंतर इस्रोचे अध्यक्ष ए. सोमनाथ चर्चेत आहेत. त्यांचं ‘निलावू कुडीचा सिंहगल’ हे मल्याळम भाषेतील आत्मचरित्र पुढच्या आठवड्यात प्रकाशित होणार होते. परंतु, या आत्मचरित्राचं प्रकाशन त्यांनी थांबवलं आहे. या आत्मचरित्रात के. सिवन यांच्यावर टीका करण्यात आल्याचा दावा अनेकांकडून करण्यात आला. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. परिणामी त्यांनी प्रकाशन मागे घेतले.
एस. सोमनाथ यांची इस्रोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याकरता के. सिवन (इस्रोचे माजी अध्यक्ष) यांनी हस्तक्षेप केला होता, असा दावा या पुस्तकातून करण्यात आल्याचा आरोप केला जातोय. पुस्तक प्रकाशनाआधीच प्रकाशकांनी पुस्तकाच्या प्रती कोणाला तरी दिल्या असल्याने हा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रकाशन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं एस सोमनाथ म्हणाले.
के. सिवन यांच्यावर टीका केल्याच्या दाव्यावर एस. सोमनाथ म्हणाले की, मी या पुस्तकातून कोणालाही व्यक्तिशः टार्गेट केलेलं नाही. महत्त्वाच्या पदांवर असलेल्या व्यक्तींना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. एखाद्या संस्थेत पद मिळवण्याकरताही अनेक आव्हाने असतात. ही आव्हाने प्रत्येकाला झेलावी लागतात. एकाच पदासाठी अनेक व्यक्ती पात्र असू शकतात. मी हाच मुद्दा पुस्तकांतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मी यासंदर्भात कोणत्याही व्यक्तीला लक्ष्य केलेलं नाही. तसंच, चांद्रयान २ मोहीम अयशस्वी झाल्याच्या घोषणेच्या संदर्भात स्पष्टता नव्हती, असा उल्लेख या पुस्तकात केल्याचं त्यांनी मान्य केलं आहे.
जीवनातील आव्हाने आणि अडथळ्यांचा सामना करून यशस्वी होण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हे आत्मचरित्र लिहिलं असून कोणावरही टीका करण्याकरता लिहिलेलं नाही, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.