इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे हजारो शास्त्रज्ञ नऊ दिवसांनंतर येत असलेल्या ‘मंगल घटिके’ची वाट पहात आहेत. इस्रोने ५ नोव्हेंबर २०१३ रोजी मंगळावर पाठविलेले ‘मंगळयान’ २४ सप्टेंबरला मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. या मोहिमेच्या दृष्टीने शेवटचे ४१ तास महत्त्वाचे आहेत, असे मंगळ मोहिमेचे संचालक एम. अण्णा दुराई यांनी येथे सांगितले.
ते म्हणाले की, हजारो शास्त्रज्ञांचे परिश्रम या मोहिमेत कारणी लागले असून, त्यामुळे या मोहिमेच्या यशाबाबत सर्वानाच उत्सुकता आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास इस्रो ही मंगळावर यान पाठवणारी पहिली आशियाई संस्था ठरणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या मोहिमेतील आव्हानांबाबत ते म्हणाले की, मंगळावरून संदेश येण्यास १२ मिनिटे लागतात. त्यामुळे यानाचे नियंत्रण करणे आव्हानात्मक असते. परग्रहावर पाठवलेली भारताची ही पहिलीच मोहीम आहे.
डॉ. व्ही. कोटेश्वर राव यांनी सांगितले की, २२ सप्टेंबरला हे यान मंगळाच्या कक्षेत नेण्याचे प्रयत्न सुरू केले जातील व त्यात अखेरचा टप्पा २४ सप्टेंबरला सकाळी पार पाडला जाईल. यात लिक्विड अपोजी मोटार प्रज्वलित केली जाईल.
सध्या नासाचे मावेन यान व भारताचे मंगळ यान हे दोन्ही मंगळाच्या जवळ असले तरी त्यांची टक्कर होण्याची शकता नाही. कारण ते वेगळ्या प्रतलात आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंगळावरील संभाव्य मानवी वस्तीबाबत विचारलेल्या प्रश्नावर राव म्हणाले की, २०३० ते २०५० सालापर्यंत ही गोष्ट कदाचित शक्य होईल. मंगळ मोहिमेत व इतर मोहिमेत नासा व इस्रो यांच्या सहकार्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संकेत त्यांनी दिले. मंगळ यानाची स्थिती सध्या उत्तम असल्याचे ते म्हणाले.

* २२.३ किमी प्रतिसेकंद या गतीने प्रवास.
* ९ एप्रिल २०१४ रोजी निम्मा प्रवास पूर्ण.
* २१ कोटी १० लाख कि.मी. चा प्रवास शनिवापर्यंत पूर्ण. मोहीमेद्वारे मंगळाच्या पृष्ठभागाचे व्यापक संशोधन.
* मंगळावरील हवामानाचेही सखोल संशोधन.
* मिथेन वायूबाबत संशोधन. या वायूमुळे तेथे सूक्ष्म जीवसृष्टी आहे का, याचाही शोध घेतला जाणार.

Story img Loader