भारताच्या मंगळ मोहिमेचे पडघम वाजू लागले असून यात एक मार्स ऑरबायटर यान ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पाठवले जाणार आहे. मंगळावर वसाहतयोग्य स्थिती जीवसृष्टीस अनुकूल आहे किंवा कसे या प्रश्नाचा वेध या मोहिमेत घेतला जाणार असून ही मोहीम यशस्वी झाल्यास इस्रोचे महत्त्व वाढणार आहे.
ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक पीएसएलव्ही एक्सएलच्या माध्यमातून हे मार्स ऑरबायटरला घेऊन जाणार आहे. ऑरबायटरचे वजन १५ किलो आहे. मंगळाचा पृष्ठभाग, वातावरण व खनिजशास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे त्यात आहेत. लिमन अल्फा फोटोमीटर या उपकरणाच्या मदतीने डय़ुटेरियम व हायड्रोजन यांचा अभ्यास करील तर मिथेन संवेदक हा मंगळावरील मिथेनचा अभ्यास करणार आहे. मार्शियन एक्सोफेरिक कम्पोझिशन एक्स्प्लोरर या उपकरणाने मंगळाच्या वातावरणातील वरच्या थराचा अभ्यास करील.
मार्स कलर कॅमेरा (एमसीसी) हे उपकरण मंगळाच्या प्रकाशीय प्रतिमा घेईल. टीआयआर इमेजिंग स्पेक्ट्रोमीटर च्या मदतीने मंगळाचा पृष्ठभाग व खनिजशास्त्राचा अभ्यास करणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारताची मंगळ मोहीम होईल यात संभाव्य कालावधी हा २१ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०१३ हा असणार आहे.
इस्रोचे अध्यक्ष के.राधाकृष्णन यांनी सांगितले, की मंगळावर पोहोचण्याची तंत्रक्षमता मिळवणे हा या मोहिमेचा हेतू आहे, अनेक तांत्रिक आव्हानांवर त्यात मात करावी लागणार आहे. ४० कोटी किलोमीटर अंतरावर फिरणाऱ्या यानाचे नियंत्रण करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. हे यान व्हॅन अॅलेन पट्टय़ात जाणार असून त्याला प्रारणांपासून संरक्षण द्यावे लागेल. चांद्रयान अवघे चार लाख किलोमीटर अंतरावर होते. मंगळाकडे पाठवलेला संदेश यानापर्यंत जाण्यास वीस मिनिटे लागणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा