भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने (ISRO) ने दिवाळीच्या मुहूर्तावर ऐतिहासिक कामगिरी करत भारतीयांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. इस्रोकडून रविवारी सर्वात वजनदार रॉकेट असलेल्या LVM-3 द्वारे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटामधून मध्यरात्री १२ वाजून ०७ मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात आले. या पहिल्या व्यावसायिक प्रक्षेपणाद्वारे ३६ OneWeb उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत.
हेही वाचा – ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी जॉन्सन, सुनक यांचे प्रयत्न
OneWeb ही एक ब्रिटिश खासगी उपग्रह कंपनी असून त्यांचे ३६ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. याकामगिरीबरोबरच इस्रोने ग्लोबल कमर्शियल लॉन्च सर्विस मार्केटमध्येही प्रवेश केला आहे.
इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, LVM-3 हे रॉकेट ४३.५ मीटर लांब असून आणि त्यात आठ हजार किलोपर्यंत उपग्रह वाहून नेण्याची क्षमता आहे. तसेच २०२३ मध्येही LVM-3 द्वारे आणखी ३६ OneWeb उपग्रह अवकाशात सोडले जाणार आहेत. ब्रिटनबरोबर झालेल्या १०८ उपग्रहांच्या करारांतर्गत पहिल्या टप्प्यात ३६ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत.