भारतीय वेधशाळा ‘अॅस्ट्रोसॅट’चे अवकाशात प्रक्षेपण
अॅस्ट्रोसॅट ही संशोधन वेधशाळा यशस्वीपणे अवकाशात सोडून भारताने ऐतिहासिक भरारी घेतली आहे. खगोलीय वेधशाळा अवकाशात सोडणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताला स्थान मिळाले आहे.
विश्वाचे सखोल आकलन करण्यासाठी वेधशाळेच्या रूपातील अॅस्ट्रोसॅट या उपग्रहाचा उपयोग होणार आहे. या मोहिमेत अमेरिकेसारख्या देशातील एका कंपनीचे चार उपग्रह प्रथमच भारतीय अवकाशतळावरून सोडण्यात आले. किफायतशीर अवकाश मोहिमांमध्येही भारताने आणखी एक पाऊल टाकले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाचे हे ३१ वे यशस्वी उड्डाण होते. या प्रक्षेपकाने अॅस्ट्रोसॅटसह एकूण सात उपग्रह अवकाशात सोडले आहेत. येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून हा प्रक्षेपक सकाळी झेपावला व त्याने अवघ्या २५ मिनिटांत या उपग्रहांना कक्षेत प्रस्थापित केले.
अॅस्ट्रोसॅट या उपग्रहास क्ष-किरण दुर्बीण असून तिला ‘मिनी हबल’ असेही म्हटले जाते. अमेरिकेच्या नासा या अवकाश संस्थेने १९९० मध्ये हबल दुर्बीण सोडली होती. खगोलाच्या निरीक्षणासाठीच ही व्यवस्था करण्यात आली होती. आतापर्यंत जपान, अमेरिका, रशिया व युरोपीय समुदाय यांनी अवकाश वेधशाळा सोडल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वेल डन इस्रो’ असा संदेश पाठवला असून वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे. उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा करताना इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी सांगितले, की आताची मोहीम खगोलशास्त्राशी संबंधित होती. जागतिक समुदायासाठी त्यामुळे नवी वैज्ञानिक माहिती उपलब्ध होणार आहे. इस्रोच्या चमूने अतिशय चांगली कामगिरी केली आहे.
सॅनफ्रान्सिस्को येथील एका कंपनीचे चार लघुउपग्रह या वेळी सोडण्यात आले. त्यासाठी इस्रोच्या अँट्रिक्स कार्पोरेशनशी करार करण्यात आला होता. इंडोनेशियाचा लापान ए२ हा सागरी सर्वेक्षण उपग्रह तसेच कॅनडाचा एनएलएस १४ (इव्ही ९) हा उपग्रह या वेळी या प्रक्षेपकाच्या मदतीने सोडण्यात आला. लेमूर लघुउपग्रह हे सॅनफ्रान्सिस्कोच्या स्पायर ग्लोबल इन्कार्पोरेशन या कंपनीचे आहेत, हे उपग्रह दिसणार नाहीत, इतके लहान आहेत. पीएसएलव्ही प्रक्षेपकाचे हे ३० वे यशस्वी उड्डाण होते. या प्रक्षेपकाने वीस देशांचे ५१ परदेशी उपग्रह सोडले असून, त्यात जर्मनी, फ्रान्स, जपान, कॅनडा, ब्रिटन या देशांच्या उपग्रहांचा समावेश होता.