भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमातील मैलाचा दगड ठरू शकणाऱया मंगळयानाने मंगळवारी दुपारी दोन वाजून ३८ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपक तळावरून प्रक्षेपण केले. पीएसएलव्ही सी २५ या प्रक्षेपकाच्या साह्याने मंगळयान अवकाशात झेपावले. पृथ्वीपासून मंगळापर्यंतचा प्रवास करण्यासाठी या यानाला ३०० दिवसांचा कालावधी लागणार आहे. प्रक्षेपक यानाला पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावण्यात यशस्वी ठरला असल्याचे इस्रोने सांगितले.
मंगळयान मोहीम यशस्वी व्हावी, यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी तिरुपती येथे बालाजीची सपत्नीक पूजा केली. पूजेच्यावेळी त्यांनी मंगळयानाची प्रतिकृती बालाजीच्या चरणी अर्पण केली. मंगळयान मोहीम यशस्वी झाल्यास भारताच्या अंतराळ मोहिमांना मोठी कलाटणी मिळणार आहे.
भारताच्या मंगळ मोहिमेची उद्दिष्टे…
भारताचे यान यशस्वीपणे मंगळावर पोहोचल्यास आशिया खंडातील देशांमधील अवकाशमोहिमांमध्ये भारताचे वर्चस्व सिद्ध होणार आहे. मंगळापर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱया कालावधीच्या दृष्टीनेही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) हा प्रकल्प ऐतिहासिक ठरणार आहे. पहिल्यांदाच एवढ्या कालावधीची मोहीम इस्रोने हाती घेतली आहे. मंगळावरील वातावरणाचा अभ्यास या मोहिमेत करण्यात येणार असून, मंगळावर मिथेनचे साठे किती आहेत, त्यांचे स्वरुप काय आहे, याचीदेखील माहिती जमविण्यात येणार आहे.
आशिया खंडामध्ये २०११ मध्ये चीनने त्यांचे अंतराळयान मंगळावर पाठवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे चीनला त्यात यश आले नव्हते.
मंगळयानाविषयी…
– हे यान आंध्र प्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून सतीश धवन अंतराळ केंद्रावरून मंगळाच्या दिशेने प्रक्षेपित करण्यात आले.
– साधारणपणे २५ दिवस हे यान पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावेल आणि ३० नोव्हेंबरला पृथ्वीच्या कक्षेतून पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचा वापर करून मंगळाकडे झेपावेल. इस्रोच्या अंदाजानुसार २१ सप्टेंबर २०१४ पर्यंत हे यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावेल, अशी अपेक्षा इस्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी व्यक्त केली.
– प्रक्षेपणानंतर उपलब्ध होणारी माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क व संपर्कक्षेत्राच्या बाहेर असताना इस्रो नासाच्या डीप स्पेस नेटवर्कची मदत घेणार आहे. या स्पेस नेटवर्कच्या मदतीने आंतरग्रहीय मोहीम राबवणे हे सुद्धा मोठे आव्हानच ठरणार आहे.
– मंगळाभोवतीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत भ्रमण करताना हे यान मंगळाच्या जमिनीपासून साधारणतः ३७१ किमी अंतरावरून भ्रमण करेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा