मंगळमोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’ने (इस्रो) गुरुवारी ‘आयआरएनएसएस-१सी’ या तिसऱ्या दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. भारताच्या महात्त्वाकांक्षी ‘विभागीय नेव्हिगेशन प्रणाली’द्वारे (आयआरएनएसएस) सात दिशादर्शक उपग्रह अंतराळात सोडण्यात येणार असून, यापूर्वीच दोन उपग्रह सोडण्यात आल्याची माहिती इस्रोने दिली.
श्रीहरिकोटा येथील ‘सतीश धवन अंतराळ केंद्रा’तून गुरुवारी पहाटे १.३२ वाजता ‘पीएसएलव्ही-सी२६’ या उपग्रह प्रक्षेपकाच्या साहाय्याने हा उपग्रह अवकाशी सोडण्यात आला. २० मिनिटांनंतर हा उपग्रह त्याच्या निश्चित कक्षेत यशस्वीपणे स्थापित करण्यात आला, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी दिली. या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
अमेरिकेच्या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस)च्या धर्तीवर विभागीय नेव्हिगेशन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. त्या उद्देशाने इस्रो सात दिशादर्शक उपग्रह अंतराळात सोडणार आहे. या उपग्रहाचे वजन १,४२५ किलोग्रॅम आहे. हा उपग्रह १० ऑक्टोबर रोजीच अंतराळात सोडण्यात येणार होता, मात्र काही तांत्रिक कारणामुळे उपग्रह सोडण्याची तारीख बदलण्यात आली. गेल्या आठवडय़ात इस्रोच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन हा उपग्रह9 सोडण्याची तारीख १६ ऑक्टोबर निश्चित केली.
इस्रोने नेव्हिगेशन प्रणाली विकसित करण्यासाठी तीन उपग्रह अंतराळात सोडले आहेत.
१ जुलै २०१३ : ‘आयआरएनएसएस-१ए’
४ एप्रिल २०१४ : ‘आयआरएनएसएस-१बी’
१६ ऑक्टोबर २०१४ : ‘आयआरएनएसएस-१सी’