७०० किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा अचूक भेद करण्याची क्षमता असलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘निर्भय’ क्षेपणास्त्राची शुक्रवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. ध्वनीवेगाइतकीच क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रवाहू असून येथून जवळच असलेल्या चांदीपूर येथील केंद्रावर सकाळी १० वाजून ३ मिनिटांनी ही चाचणी घेण्यात आली.
एका फिरत्या प्रक्षेपकावरून सकाळी ‘निर्भय’ क्षेपणास्त्र सोडण्यात आले. सुमारे सव्वा तास घेण्यात आलेल्या या चाचणीत या क्षेपणास्त्राने सर्वच आघाडय़ांवर आपली यशस्विता सिद्ध केली, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. ७०० ते १००० किलोमीटर पल्ल्याच्या या क्षेपणास्त्राची ही दुसरी चाचणी. यापूर्वी १२ मार्च २०१३ रोजी याची ‘निर्भय’ची पहिली चाचणी घेण्यात आली होती. मात्र त्या वेळी सर्वच आघाडय़ांवर क्षेपणास्त्राची अचूकता सिद्ध होऊ शकली नव्हती, या वेळी ‘निर्भय’ने आपली समर्थता सर्वच अंगांनी सिद्ध केली, हेच या चचणीचे वेगळेपण आणि महत्त्व.
ब्राह्मोस क्षेपणास्त्र हे २९० किलोमीटरचा पल्ला असलेले पहिले आंतरखंडीय ध्वनातीत वेग असलेले अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र. हे क्षेपणास्त्र भारत आणि रशिया यांच्या संयुक्त प्रयत्नांनी तयार करण्यात आले होते. मात्र त्यापेक्षा अधिक क्षमतेचे ‘निर्भय’ क्षेपणास्त्र संपूर्णपणे भारतीय बनावटीचे असून, ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’तर्फे (डीआरडीओ) विकसित करण्यात आले आहे.
पंतप्रधानांकडून कौतुकाची थाप
‘निर्भय’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारताच्या संरक्षण सिद्धतेत भर पडली आहे. हे भारतीय शास्त्रज्ञांच्या अविरत प्रयत्नांचे यश आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.