देशातील आजवरच्या सर्वात मोठ्या स्वदेशी बनावटीच्या ‘जीसॅट ६ ए’ या दळवळण उपग्रहाचा संपर्क तुटला आहे. गुरुवारी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. या उपग्रहाच्या बांधणीसाठी २७० कोटी रुपये खर्च झाले होते.
श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून गुरुवारी संध्याकाळी जीएसएलव्ही एफ ०८ या प्रक्षेपकाच्या सहाय्याने जीसॅट ६ ए या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. २७० कोटी रुपये खर्च करुन हे उपग्रह तयार करण्यात आले होते. हे उपग्रह १० वर्षांपर्यंत सेवा देईल, असे इस्रोने स्पष्ट केले होते. या उपग्रहामुळे सॅटेलाइट आधारित मोबाइल कॉलिंग आणि कम्यूनिकेशन सेवा अधिक प्रभावी होणार होती. तसेच यामुळे दुर्गम ठिकाणी तैनात असलेल्या भारतीय सैन्य दलांमध्ये समन्वय आणि संवाद अधिक सुलभ होणार होते. जीसॅट ६ ए या उपग्रहाकडे सर्वात मोठा अॅँटेना असून इस्त्रोनेच त्याची निर्मिती केली होती. सर्वसामान्यांच्या दृष्टीने आणि भारतीय सैन्याच्या दृष्टीने हे उपग्रह अत्यंत महत्त्वाचे ठरणार होते.
इस्रोच्या या महत्त्वाकांक्षी मोहीमेला रविवारी हादरा बसला. शनिवारपासून उपग्रहाशी संपर्क तुटला होता. पॉवर सिस्टममधील बिघाडामुळे ही नामुष्की ओढावल्याचे समजते. उपग्रहाशी पुन्हा संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात म्हटले आहे. ‘इस्रो’कडून या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत उपग्रहाशी संपर्क होता. मात्र, त्यानंतर काहीच माहिती उपलब्ध होत नव्हती.
After successful long duration firings, when satellite was on course to normal operating configuration for third and final firing, scheduled for April 1, 2018, communication from the satellite was lost. Efforts underway to establish link with satellite: ISRO on #GSAT6A
— ANI (@ANI) April 1, 2018