चांंद्रयान ३ माहीमेतील एक महत्त्वाच्या टप्प्याला आज मध्यरात्रीपासून सुरुवात होणार आहे. आज मध्यरात्री म्हणजे रात्री १२ ते एक च्या दरम्यान चांंद्रयान ३ मधील इंजिन सुरु केले जाणार आहे आणि त्यामुळे यान हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्ती भेदत चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु करणार आहे.
चांंद्रयान ३ चे १४ जुलैला इस्रोच्या श्रीहरीकोट या तळावरुन यशस्वी प्रक्षेपण झालं होतं. तेव्हा चांंद्रयानने १७३ किलोमीटर ते ४१ हजार ७६२ अशा लंबवर्तूळाकार कक्षेत पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. पृथ्वीभोवती प्रत्येक प्रदक्षणा पूर्ण करतांना चंद्रयानचे इंजिन हे प्रज्वलित करण्यात येत होते आणि त्याची कक्षा वाढवण्यात येत होती. सध्या चांंद्रयान हे २३६ किलोमीटर ते एक लाख २७ हजार ६०९ किलोमीटर या कक्षेत पृथ्वीला प्रदक्षणा घालत आहे.
आज मध्यरात्री चांंद्रयान ३ चे इंजिन २५ मिनीटांपेक्षा जास्त प्रज्वलित केले जाणार आहे. यामुळे चांंद्रयानचा वेग हा १० किलोमीटर प्रति सेकंद एवढा होईल आणि या वेगामुळे चांंद्रयान ३ हे पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती भेदत चंद्राच्या दिशेने निघणार आहे.
चंद्राच्या कक्षेत कधी पोहचणार?
चंद्र आणि पृथ्वी दरम्यानचे सरासरी अंतर हे ३ लाख ८४ हजार किलोमीटर एवढं आहे. सध्या चांंद्रयान हे पृथ्वीपासून एक लाख २७ हजार ६०९ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. तेव्हा यानाला चंद्राच्या कक्षेत पोहचायला आणखी दोन दिवस लागणार आहेत.
पुढे काय ?
चांंद्रयान ३ हे चंद्राच्या जवळ पोहचल्यावर त्याला चंद्राच्या कक्षेत अचुकरित्या पोहचावं लागेल. काही चूक झाली तर चांंद्रयान हे चंद्रापासून दूर निघून जाईल किंवा चंद्रावर आदळेल. चंद्राच्या कक्षेत पोहचल्यावर चांंद्रयान ३ चंद्राभोवती काही दिवस प्रदक्षणा घालेल आणि हळूहळू कक्षा कमी करत १०० किलोमीटरच्या कक्षेत स्थिरावेल. त्यानंतर चंद्राच्या दक्षिण भागात असलेली योग्य जागा निश्चित झाल्यावर तिथे अलगद उतरण्याचा प्रयत्न करेल. यासाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा उजाडण्याची शक्यता आहे.