भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रो येत्या १२ एप्रिलला IRNSS-1I हा बॅकअप उपग्रह अवकाशात पाठवणार आहे. IRNSS-1I उपग्रह IRNSS-1A या दिशादर्शक उपग्रहाची जागा घेईल. IRNSS-1A च्या रिबीडीयुम घडयाळात बिघाड झाला आहे. दिशादर्शक उपग्रहाच्या सिग्नल रिसिव्हर्समुळे तुम्ही नेमके कुठल्या दिशेला आहात त्याची माहिती मिळेल. मच्छीमारांना समुद्रात जाण्याआधी वातावरणाची योग्य माहिती मिळेल. तामिळनाडू आणि केरळमधील जास्तीत जास्त बोटींवर सिग्नल रिसिव्हर्स बसवण्यात येतील.
येत्या १२ एप्रिलला श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन PSLV प्रक्षेपकाद्वारे IRNSS-1I अवकाशात पाठवण्यात येणार आहे. PSLV चे हे ४३ वे उड्डाण आहे. दिशादर्शनच्या सात उपग्रहांची एक साखळी आहे. IRNSS-1I अवकाश कक्षेत स्थिर झाल्यानंतर या उपग्रहांच्या समूहामध्ये दाखल होईल. मागच्यावर्षी ऑगस्ट २०१७ मध्ये आयआरएनएसएस-१एच उपग्रहाचे प्रक्षेपण अखेरच्या टप्प्यात अयशस्वी ठरले होते.
उड्डाणाचे सुरूवातीचे टप्पे यशस्वीपणे पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यात अंतराळात प्रवेश करताना उपग्रहाभोवतीचे ‘हिट शिल्ड’चे आवरण वेगळे होणे, अपेक्षित होते. मात्र, तसे घडले नाही. त्यामुळे प्रक्षेपकाच्या अंतर्गत भागापासून विलग होऊनही उपग्रह आतमध्येच अडकून राहिला. बदली उपग्रह म्हणून आयआरएनएसएस-१एच उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला होता.