दिशादर्शक उपग्रहाचे उड्डाण यशस्वी केल्यानंतर आता आमचे लक्ष्य मंगळ मोहीम हे आहे, मार्स ऑरबायटर यान सोडताना आपोआपच पीएसएलव्हीचे पंचविसावे उड्डाणही साजरे होणार आहे, एवढेच नव्हे तर अनेक उपग्रह यावर्षी उड्डाणासाठी रांगेत आहेत, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी आज सांगितले.
ते म्हणाले की, यावर्षी २१ ऑक्टोबरनंतर केव्हाही मंगळ मोहिमेतील यान सोडले जाऊ शकते त्यानंतर त्याचा मंगळाच्या दिशेने प्रवास २८ किंवा २९ नोव्हेंबरला सुरू होईल. येत्या काही महिन्यांत अनेक उपग्रह अवकाशात सोडले जाणार असून त्यात या महिन्याच्या शेवटी इन्सॅट ३ डी हा उपग्रह एरियन ५ अग्निबाणाच्या मदतीने सोडला जाईल, त्यानंतर ६ ऑगस्टला जीसॅट १४ हा दळणवळण उपग्रह सोडला जाणार आहे. डिसेंबरमध्ये स्पॉट ७ या परदेशी उपग्रहासह पीएसएलव्ही अवकाशात झेपावणार आहे. जानेवारी २०१४ मध्ये जीएसएलव्ही मार्क ३ या उपग्रह प्रक्षेपकाचे चाचणी उड्डाण होणार असून मार्च २०१४ मध्ये आयआरएनएसएस १ डी हा उपग्रह सोडला जाणार आहे.
दिशादर्शक उपग्रह प्रणाली केव्हा सुरू होईल असे विचारले असता राधाकृष्णन यांनी सांगितले की, आपले या मालिकेतील सात पैकी चार उपग्रह अवकाशात गेल्यानंतर ही सेवा कार्यान्वित करता येईल. दिशादर्शक संदेश ग्रहण यंत्रणा उभारण्यासाठी काही उद्योगांशी चर्चा सुरू आहे असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे ए. एस. किरण कुमार यांनी सांगितले.
राधाकृष्णन म्हणाले की, सरकारने जीसॅट १५ व जीसॅट १६ या उपग्रहांच्या बांधणीला मंजुरी दिली आहे, या उपग्रहांमुळे आपली ट्रान्सपाँडर क्षमताही वाढणार आहे. खासगी उद्योजकांचा अंतराळ मोहिमात वापरली जाणारी उपकरणे तयार करण्यातील सहभाग वाढत आहे व हा सहभाग आणखी वाढत जावा असे आपल्याला वाटत असल्याचे राधाकृष्णन यांनी सांगितले. ते म्हणाले की ४०० औद्योगिक संस्था आमच्याबरोबर सध्या सहकार्य करीत आहेत. इस्रोच्या वर्षांला १२ अंतराळ मोहिमा होत असतात त्यामुळे आम्हाला अधिक खासगी सहभागाची अपेक्षा आहे.
पीएसएलव्हीच्या मदतीने पहिला दिशादर्शन उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडण्यात आला हे सांगताना आपल्याला विशेष आनंद वाटतो असे ते म्हणाले.