काही दिवसांपूर्वीच अवघ्या देशानं इस्रोच्या वैज्ञानिकांना डोक्यावर घेऊन त्यांचं कौतुक केलं होतं. भारताचं यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरल्यामुळे देशाची मान अभिमानानं उंचावली असून त्याचं श्रेय या मोहिमेसाठी अहोरात्र झटणाऱ्या इस्रोच्या वैज्ञानिकांचं असल्याचं अवघ्या देशानं मान्य केलं होतं. मात्र, आठवड्याभरातच इस्रोच्या एका वैज्ञानिकाशी रस्त्यावरच्या एका गर्दुल्ल्यानं अरेरावी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या वैज्ञानिकानं यासंदर्भातला व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला असून आपली नाराजीही व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडलं?

हा सगळा प्रकार बंगळुरूच्या जुन्या एअरपोर्ट रोडवर HAL अंडरपासजवळ घडला. आशिष लांबा असं या वैज्ञानिकांचं नाव असून त्यांनी ट्विटरवर घडला प्रकार कथन केला आहे. त्यासोबत त्यांनी या प्रकाराचा काढलेला व्हिडीओही शेअर केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष लांबा २९ ऑगस्ट रोजी सकाळी इस्रोच्या ऑफिसमध्ये आपल्या नियमित वेळी निघाले होते. यावेळी एका स्कूटीवर बसलेल्या गर्दुल्ल्याने त्यांच्या गाडीच्या बाजूने वेगाने पुढे जात थेट त्यांच्या कारसमोर स्कूटी थांबवली. त्यामुळे आशिष लांबा यांना तातडीने त्यांच्या कारचे ब्रेक दाबावे लागले.

“मी देवळांत का जातो?”, इस्रोच्या अध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

“या माणसानं हेलमेटही घातलेलं नव्हतं. त्यानं अचानक माझ्या कारच्या समोर स्कूटी थांबवली. मग तो ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला आला आणि माझ्याशी वाद घालू लागला. त्यानंतर कारच्या समोर जाऊन त्यानं दोन वेळा माझ्या कारला लाथ मारली आणि स्कूटी चालू करून तिथून पळून गेला”, असं आशिष लांबा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आशिष लांबा यांनी कारच्या डॅशबोर्डवरील कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार रेकॉर्ड केला आहे. तो व्हिडीओ त्यांनी शेअर करत बंगळुरू पोलिसांना त्या ट्वीटमध्ये टॅग केलं. यावरून सोशल मीडियावर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर बंगळुरू पोलिसांनी त्यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना “आम्ही याची दखल घेतली असून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे”, असा रिप्लाय ट्वीटवर दिला.

बनावट इस्रो वैज्ञानिकही चर्चेत!

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने आपण इस्रोचे वैज्ञानिक असल्याचा बनाव करून माध्यमांना मुलाखती द्यायला सुरुवात केली होती. हा प्रकारही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. इस्रोच्या लँडर मॉड्युलचं डिझाईन आपणच तयार केल्याचा दावा हा व्यक्ती करत होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून मितुल त्रिवेदी असं त्याचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. तो एक खासगी कोचिंग क्लास चालवत असून क्लासमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी त्यानं हा सगळा प्रकार केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isro scientist on chandrayan mission attacked by scooty rider in bengaluru pmw
Show comments