ISRO’s Comprehensive Underwater Bridge Map इस्रोच्या शास्त्रज्ञांनी नासाच्या ICESat-2 या सॅटेलाईटच्या मदतीने समुद्राच्या पाण्याखाली गेलेल्या राम सेतूचा पहिला सर्वसमावेशक नकाशा तयार करण्यात यश मिळवले आहे. राम सेतू हा ॲडम्स ब्रिज म्हणूनही प्रसिद्ध आहे. रामसेतूबाबत इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. इस्रोच्या जोधपूर आणि हैदराबाद नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरच्या शास्त्रज्ञांकडे या शोध निबंधाचे श्रेय जाते. त्यांनी या संशोधनात म्हटले आहे की, ‘आम्ही, नासाचा उपग्रह ICESat-2 वॉटर पेनेट्रेट फोटॉन वापरून ॲडम्स ब्रिजचा पहिला तपशीलवार नकाशा तयार केला आहे. राम सेतूचा ९९.९८ टक्के भाग अतिशय उथळ पाण्यात बुडाला आहे. त्यामुळे या सेतूचे जहाजाद्वारे सर्वेक्षण किंवा प्रत्यक्ष पाण्यात उतरून सर्वेक्षण करणे शक्य नसल्याने उपग्रहाची मदत घेण्यात आलेली आहे’. हा नकाशा तयार करण्यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी ICESat-2 उपग्रहाच्या प्रगत लेझर तंत्रज्ञानाचा वापर केला. गिरीबाबू दंडबथुला यांनी या प्रकल्पाचे नेतृत्त्व केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अधिक वाचा: विश्लेषण: अंकुशपुराण : अस्सल महाराष्ट्रीय रामायण आहे तरी काय?

शास्त्रज्ञांनी २०१८ (ऑक्टोबर) ते २०२३ (ऑक्टोबर) पर्यंतच्या डेटाचा वापर करत जलमग्न सेतूच्या संपूर्ण लांबीचा १० मीटर रिझोल्यूशनचा नकाशा तयार केला आहे. या नकाशानुसार २९ किलोमीटर लांबीच्या राम सेतूची समुद्रसपाटीपासून उंची ८ मीटर इतकी आहे. अशा प्रकारचा नकाशा आजपर्यंतचा सर्वांत मोठा नकाशा आहे.

अधिक वाचा: विश्लेषण : शूर्पणखा स्वतंत्र स्त्री ते राक्षसी… खरेच कोण होती ती?

राम सेतू हा भारतातील रामेश्वरम बेटाच्या दक्षिण-पूर्वेकडील धनुषकोडीपासून, श्रीलंकेतील मन्नार बेटाच्या उत्तर-पश्चिम टोकापर्यंत, तलाईमन्नारपर्यंत पसरलेला आहे. हा प्राचीन सेतू भारतातील धनुषकोडीला श्रीलंकेतील तलाईमन्नार बेटाशी जोडतो. रामायणात या पुलाचा उल्लेख आढळल्याने राम सेतूला सांस्कृतिक महत्त्व आहे. रामाच्या वानर सेनेने लंकेपर्यंत पोहोचण्यासाठी याचा वापर केला होता. इसवी सन ९ व्या शतकापर्यंत पर्शियन लोक या पुलाला ‘सेतू बंधाई’ असे संबोधत होते. रामेश्वरममधील मंदिराच्या नोंदीनुसार, १४८० पर्यंत हा पूल समुद्रसपाटीपासून उंचीवर होता परंतु नंतरच्या काळात आलेल्या वादळात या पुलाचे नुकसान झाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isro scientists create first detailed map of underwater ram setu with nasas icesat 2 satellite svs