इंडियाची तिसरी बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत लालूप्रसाद यादव यांनी मोदींना आम्ही हटवणारच असा नारा दिला आहे. काहीही झालं तरीही आम्ही जिंकणारच, जागा वाटपावरुन आम्ही वाद घालणार नाही. इंडिया जिंकणार आणि मोदी हरणार असं लालूप्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. तसंच इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आता मोदींना सूर्यावर पाठवावं असा टोलाही लालूप्रसाद यादव यांनी लगावला.
आमच्यात एकजूट नव्हती
विविध पक्षाचे नेते वेगवेगळे होते, त्यामुळे नरेंद्र मोदी हे पुढे गेले. आमच्या एकजूट नव्हती. पण आज मला आनंद होतो आहे की आम्ही या देशाच्या विविध पक्षाचे नेते आता एकत्र आलो आहोत. आम्ही एकत्र नसल्याची किंमत देशाला मोजावी लागली. त्याचा फायदा नरेंद्र मोदी यांनी घेतला असं लालूप्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. या देशात अल्पसंख्याक वर्ग सुरक्षित नाही. काय काय चाललं आहे तुम्हाला ते माहित आहेच असंही लालूप्रसाद यादव यांनी म्हटलं आहे.
देशात गरीबी वाढली आहे, महागाई वाढली आहे
देशात गरीबी वाढते आहे, महागाई वाढते आहे. भेंडी ६० रुपये किलो झाली आहे. टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. आता आम्ही सगळे एकत्र येऊन मोदींना लढा देत आहोत. आमची ही तिसरी बैठक आहे. या बैठकीतून एका निष्कर्षावर आम्ही पोहचलो आहोत. तुम्हाला माहित आहेच की खोटं बोलून, अफवा पसरवून सत्ताधारी सत्तेत आले. आमच्या विरोधात असा अपप्रचार केला गेला की आमचा पैसा स्वीस बँकेत आहे. त्यावेळी मोदींनी ही घोषणा केली होती की प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होणार असं सांगितलं होतं. आम्हीही आमचं खातं उघडलं होतं. आम्ही ११ जण आहोत एका कुटुंबात त्यामुळे आम्हाला वाटलं खूप पैसे मिळतील. मात्र तो जुमलाच होता. सगळ्या देशातल्या लोकांची बँक खाती उघडण्यात आली. काय मिळालं तुम्हाला? माहित आहेच ना. एक पैसाही मिळाला नाही.
इस्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक आणि आवाहन
सध्या चांद्रयान आपण चंद्रावर पाठवलं आहे. त्यामुळे इस्रोचं कौतुक होतं आहे. आता आम्ही ऐकलं आहे की मोदीजी हा विचार करत आहेत की देशाची प्रगती झाली पाहिजे. आता माझं इस्रोच्या शास्त्रज्ञांना हे आवाहन आहे की त्यांनी नरेंद्र मोदींना सूर्यावर पाठवावं. सूर्यावर एकदा मोदी पोहचले की जगभरात त्यांचं नाव होईल असा टोलाही लालूप्रसाद यादव यांनी लगावला.
राहुल गांधी अमेरिका आणि इतर देशांमध्ये फिरत असतात. त्यांनाही कळेल की मोदीजी सूर्यावर गेले आहेत. तिथे जाऊन देशाचं नाव ते उंचावत आहेत. दसरा झाला की याची तयारी इस्रोने सुरु करावी. आमची शुभेच्छा आहे की मोदींनी आता सूर्यावर जावं. एकीकडे इतकी गरीबी आहे, महागाई आहे आणि सांगितलं जातं आहे देश विकास करतो आहे. विरोधकांच्या मागे ईडी, सीबीआय लावायची. आम्ही पूर्वी हे ऐकायचो की गरीबांना खोट्या केसेस मधे अडकवून छळायचं. आम्हालाही असंच छळलं गेलं मात्र आम्ही घाबरणार नाही, आम्ही लढणार आहोत असंही लालूप्रसाद यादव म्हणाले.
आजवर माझ्यावर पाच ते सहा शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने मी जिवंत आहे. माझ्यात हिंमत आहे, त्यामुळे आता मोदींना हटवल्याशिवाय आम्ही कुणीही शांत बसणार नाही. मी गुजरातपासून त्यांच्याशी लढतो आहे. आता मात्र त्यांना हटवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मी राज्यसभेत होतो तेव्हा भैरवसिंग शेखावत उपराष्ट्रपती होते. त्यावेळी मोदींना अमेरिकेत कुणी पाऊल ठेवू देत नव्हतं असंही लालूप्रसाद यादव यांनी सांगितलं. मोदींना अटक करण्यासाठी मी आंदोलनही केलं होतं अशीही आठवण यादव यांनी सांगितली. मी आजवर अटलबिहारी वाजपेयींसारखा नेता पाहिला नाही. त्यांनी नरेंद्र मोदींना राजधर्माची आठवण करुन दिली होती हे देखील लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट केलं.