भारतीय अवकाश संशोधन संस्थेद्वारे (इस्रो) कोणत्याही अवकाश मोहिमेच्या प्रक्षेपणाआधी तिरुपतीच्या बालाजीचे आशिर्वाद घेण्याची प्रथा हा अंधश्रद्धेचाच एक भाग आहे. आणि या प्रकारावर आपला अजिबात विश्वास नाही, अशी स्पष्टोक्ती भारतरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ. सी.एन.आर.राव यांनी केली. मात्र त्याचबरोबर भारतीय विद्यार्थ्यांनी आपल्या भारतीयत्वाचा अभिमान बाळगणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भारताच्या मंगळमोहिमेआधी मंगळयानाची छोटी प्रतिकृती बालाजीच्या चरणी ठेवण्यात आली होती का आणि ‘इस्रो’तर्फे प्रत्येक मोहिमेआधी बालाजीचे आशिर्वाद घेतले जातात का, या प्रश्नाचे उत्तर डॉ. राव यांनी होकारार्थी दिले. येथील प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना, ‘माणसांची अशी श्रद्धा असते की जर ईश्वराला काही अर्पण केले तर तर ती गोष्ट निश्चितच यशस्वी होईल.. आता याला आपण काय करु शकतो?’, असा सवाल त्यांनी केला. मी अंधश्रद्धाळू नाही, माझा ज्योतिषशास्त्रावरही विश्वास नाही, असे पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष असलेल्या डॉ. राव यांनी सांगितले.
माहिती तंत्रज्ञानाचा शत्रू नाही..
आपल्यावर माहिती-तंत्रज्ञानाचे शत्रू असल्याचा आरोप केला जातो, पण त्यात तथ्य नाही, असे सांगत डॉ. राव यांनी तो आरोप फेटाळून लावला. विज्ञानाशी संबंधित कोणत्याही क्षेत्रास आपण कमी लेखत नाही. आज अनेक विद्यार्थी करियर म्हणून माहिती-तंत्रज्ञानाचा पर्याय निवडत असताना त्यांना कसे काय दुर्लक्षिता येईल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मात्र त्याचवेळी भारतातील वैज्ञानिक संशोधनाचा दर्जा अपेक्षेइतका नसल्याची कबुलीही त्यांनी दिली. याबद्दल खंत व्यक्त करतानाच, ही परिस्थिती सुधारण्यासाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
चीनची मुक्तकंठाने प्रशंसा
चीनने ज्या वेगाने आणि समर्पित भावनेने विज्ञानात प्रगती केली आहे, त्याने डॉ. राव भारावून गेले होते. चीनची अतिशय मोकळ्या मनाने स्तुती करताना संशोधनात त्यांनी जगातील बडय़ा राष्ट्रांनाही मागे टाकले असल्याचे राव म्हणाले. चीनपुढे अमेरिकाही काहीच नसल्याचा दावा त्यांनी केला. भारतीय विद्यार्थी गुणवत्तेत जराही कमी नाहीत, फक्त त्यांना जरा अधिक निश्चयशक्तीची गरज आहे. तसेच त्यांनी भारतीयत्वाचा अभिमान बाळगावा, असे सांगायलाही डॉ. राव विसरले नाहीत.