भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) सोमवारी पाच परदेशी उपग्रह श्रीहरिकोटा येथून अवकाशात सोडणार आहे. पीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या मदतीने हे उपग्रह सोडले जाणार असून त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. व्यावसायिक स्वरूपाचे हे उड्डाण असून त्यातून भारताला परकीय चलन मिळणार आहे.
४९ तासांची उलटगणती व्यवस्थित चालू असून उड्डाणाची सर्व पूर्वतयारी झाली आहे, असे सूत्रांनी सांगितले. पीएसएलव्ही सी २३ या प्रक्षेपकाचे उड्डाण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून सोमवारी सकाळी ९.५२ वाजता होणार आहे. वीस मिनिटात हे पाच उपग्रह अवकाशात सोडण्यात येतील असे इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. फ्रान्सचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह स्पॉट ७ (वजन ७१४ किलो) जर्मनीचा आयसॅट (१४ किलो), कॅनडाचे १५ किलो वजनाचे दोन उपग्रह तर सिंगापूरचा व्हेलॉक्स १ हा ७ किलो वजनाचा उपग्रह यांचा त्यात समावेश आहे. कॅनडाचे एनएलएस ७.१ व एनएलएस ७.२ हे टोरांटो विद्यापीठाने तयार केलेले उपग्रह आहेत. व्हेलॉक्स हा सिंगापूरच्या न्यानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचा उपग्रह आहे. शुक्रवारी या उपग्रहांच्या प्रक्षेपणास इस्रोच्या मंडळाने अखेरची मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रीहरिकोटा येथे येणार आहेत.