भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) ‘स्पेस डॉकिंग’ या अतिशय महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचा प्रयोग हाती घेतला आहे. तो यशस्वी झाला, तर अमेरिका, चीन, रशिया या देशांच्या रांगेत भारताला स्थान मिळेल. ७ जानेवारीच्या आसपास या प्रयोगाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
‘पीएसएलव्ही सी ६० स्पाडेक्स’ मोहीम यशस्वी झाल्याची माहिती मोहिमेचे संचालक एम. जयकुमार यांनी मंगळवारी दिली. ‘इस्रो’चे प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले, ‘रॉकेटने ४७५ किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत उपग्रहांना यशस्वीपणे नेले. पंधरा मिनिटांच्या उड्डाणानंतर उपग्रहे नियोजित कक्षेत पोहोचली. स्पाडेक्स उपग्रह एकामागोमाग एक कक्षेत गेले. काही काळानंतर दोन्ही उपग्रह एकमेकांपासून अधिक अंतरावर असतील. त्यानंतर ‘स्पेस डॉकिंग’चा प्रयोग सुरू होईल. ही प्रक्रिया पुढील आठवड्यात साधारण ७ जानेवारीच्या आसपास कदाचित सुरू होईल.’
हेही वाचा : द. कोरियाचे अध्यक्ष आणखी अडचणीत, ‘मार्शल लॉ’प्रकरणी न्यायालयाकडून वॉरंट जारी
सोमनाथ म्हणाले, ‘पीएसएलव्ही-सी ६० मोहिमेमध्ये प्रत्येकी २२० किलो वजनाचे दोन स्पाडेक्स उपग्रह वर्तुळाकार कक्षेत सोडण्यात आले. या मोहिमेत संशोधन आणि विकासासाठी आणखी २४ ‘पे-लोड’ आहेत. ‘पीएसएलव्ही’ रॉकेटच्या चौथ्या टप्प्यात ते जोडले जातील. पुढील दोन महिने त्यावर प्रयोग करण्यात येतील. नंतर अनेक अशा मोहिमा होतील.’
‘उद्योगांसाठी आनंदाची बाब’
नवी दिल्ली : या मोहिमेमधील दोन उपग्रह ‘इस्रो’च्या सहाय्याने खासगी क्षेत्रात बनविण्यात आलेले पहिलेवहिले उपग्रह आहेत. उपग्रहांची निर्मिती, चाचणी ‘अनंत टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ने (एटीएल) केली आहे. कंपनीच्या बेंगळुरू येथील अत्याधुनिक केंद्रात उपग्रहांची निर्मिती करण्यात आली. ‘इस्रो’च्या अनेक प्रकल्पांमध्ये या कंपनीचा सहभाग आहे.
हेही वाचा : चिनी हॅकरकडून अमेरिकेच्या वित्त विभागावर हल्ला; वर्कस्टेशन, दस्तऐवजांमध्ये प्रवेश केल्याची माहिती
आमच्यासाठी ही महत्त्वाची मोहीम आहे. अवकाश क्षेत्रात त्यामुळे प्रगती होईल. ही मोहीम भविष्यातील चांद्रयान-४ मोहिमेकरिता उपयुक्त ठरतील. या मोहिमेनंतर मानवासह अवकाशात उड्डाण, अवकाश स्थानकाची स्थापना यांसह विविध मोहिमा आहेत.
- एस. सोमनाथ, प्रमुख, ‘इस्रो’