अवकाश संशोधन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने आणखी एक मोठी झेप घेतली आहे. इस्त्रोने गुरुवारी सकाळी पीएसएलव्ही सी ४३ प्रक्षेपकाद्वारे एकाचवेळी ३१ उपग्रहांचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले. प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांमध्ये हायसिस हा भारताचा अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण करणारा उपग्रह आहे. अन्य उपग्रहांमध्ये आठ देशांचे ३० छोटे उपग्रह असून अमेरिकेचे सर्वाधिक २३ उपग्रह आहेत.
#Watch ISRO launches HysIS and 30 other satellites on PSLV-C43 from Satish Dhawan Space Centre in Sriharikota. #AndhraPradesh pic.twitter.com/ZtI295a4cy
— ANI (@ANI) November 29, 2018
आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन पीएसएलव्ही सी ४३ ने सकाळी ९ वाजून ५८ मिनिटांनी अवकाशाच्या दिशेने झेप घेतली. पीएसएलव्हीचे हे ४५ वे उड्डाण आहे. अवकाशातील दोन वेगवेगळया कक्षांमध्ये हे उपग्रह सोडण्यात येतील. ही संपूर्ण प्रक्रिया ११२ मिनिटांची असेल. एकाचवेळी सर्वाधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम इस्त्रोच्या नावावर आहे. इस्त्रोने मागच्यावर्षी १५ फेब्रुवारी २०१७ रोजी सर्वाधिक १०४ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले होते.
भारतात कारखान्यांमधून मोठया प्रमाणावर प्रदूषण होते. हायसिसच्या मदतीने आता या प्रदूषणावर लक्ष ठेवता येईल असे इस्त्रोकडून सांगण्यात आले. पृथ्वीच्या पुष्ठभागाचे निरीक्षण करणाऱ्या हायसिसच्या मदतीने जमीन, पाणी, वनस्पति आणि अन्य माहिती मिळवता येणार आहे. शास्त्रज्ञ त्यांना काय हवे आहे ती माहिती ते घेऊ शकतात. प्रदूषणाची माहिती देण्यामध्ये या उपग्रहाची सर्वाधिक मदत होईल. ३८० किलो वजनाच्या हायसिसचे आयुष्य पाच वर्षांचे असेल.
हायसिस दुर्मिळ प्रकारातला अत्याधुनिक उपग्रह आहे. फार कमी देशांकडे अशा प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. अनेक देश अशा प्रकारचा उपग्रह अवकाशात पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत पण अपेक्षित निकाल येण्याची शक्यता कमी असते असे इस्त्रोचे चेअरमन के.सिवन यांनी सांगितले.