भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो ( ISRO ) आता विविध अवकाश मोहिमांसाठी सज्ज झाली आहे. गेल्या दोन वर्षात करोना, करोना निर्बंध आणि टाळेबंदीमुळे इस्त्रोच्या अनेक मोहिमा या लांबणीवर पडल्या होत्या. तेव्हा २०२२ मध्ये इस्रो तब्बल १९ मोहिमा हाती घेत आहे. सध्या सुरु असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे बहुचर्चित चांद्रयान-३ ( Chandrayaan-3 ) मोहिम ही याच वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रत्यक्षात येणार असल्याचं उत्तरात स्पष्ट करण्यात आलं आहे.
चांद्रयान-३ मोहिम कशी असणार आहे ?
२०१९ च्या जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत चांद्रयान-२ मोहिम पार पडली होती. या मोहिमेत चंद्राभोवती उपग्रह पाठवण्यात इस्रोला अपयश आलं होतं. मात्र चंद्राच्या दक्षिण भागात लँडर आणि रोव्हर अलगद उतरवण्यात अपयश आलं होतं. तेव्हा नेमकं हेच आव्हान चांद्रयान-३ च्या मोहिमेत हाती घेण्यात आलं आहे. चांद्रयान-२ मोहिमेत आलेल्या अपयशाच्या अनुभवाच्या आधारावर चंद्रावर पुन्हा एकदा लँडर आणि रोव्हर अलगद उतरवण्याचा इस्रो प्रयत्न करणार आहे. चांद्रयान-३ मोहिमेत लँडर आणि रोव्हरचे नेमके स्वरुप कसे असेल, त्यामध्ये कोणती वैज्ञानिक उपकरणे असतील याची माहिती इस्त्रोने अद्याप जाहिर केलेली नाही. मात्र याबाबत आवश्यक उपकरणांच्या चाचण्या पुर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आत्तापर्यंत सोव्हिएत रशिया, अमेरिका आणि चीन या तीनच देशांनाच चंद्रावर रोव्हर अलगद उतरवण्यात आणि त्याची सफर घडवण्यात यश आलं आहे हे विशेष.
याचबरोबर वर्षभरात इस्रोच्या तब्बल १९ मोहिमा पार पाडल्या जाणार असून यामध्ये ८ उपग्रह प्रक्षेपण मोहिमा, ७ विविध प्रकारच्या अवकाश यानाबाबत मोहिमा आणि ४ तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिक संदर्भात मोहिमा असणार आहेत. या मोहिमांमध्ये RISAT-1A या उपग्रहाचे पुढील काही दिवसात PSLV या प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपण होणार आहे. या मोहिमांच्या निमित्ताने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात देशातील उद्योगांचा सहभाग वाढवत देशाची गरज पुर्ण करण्याचे धोरण आणखी जोमाने अंमलात आणणार असल्याचं लेखी उत्तरात स्पष्ट करण्यात आलं आहे.