भारताची दुसरी चंद्र मोहिम एप्रिल अखेरीस प्रत्यक्षात येऊ शकते. वेगवेगळया कारणांमुळे आतापर्यंत तीन वेळा चांद्रयान-२ मोहिम पुढे ढकलावी लागली आहे. काही चाचण्या पूर्ण झालेल्या नसल्यामुळे आम्ही मार्च-एप्रिलचा विचार करत आहोत. त्यात एप्रिल अखेरीस चांद्रयान-२ चे प्रक्षेपण होऊ शकते असे भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोचे चेअरमन के.सिवन यांनी शुक्रवारी सांगितले.
एप्रिलमध्येही मोहिम प्रत्यक्षात आली नाही तर जूनपर्यंत मोहिम पुढे ढकलावी लागेल. २०१७ आणि २०१८ मध्ये चांद्रयान-२ मोहिम पुढे ढकलावी लागल्यानंतर यावर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवडयाची तारीख ठरली होती. २०१८ च्या उत्तरार्धात इस्त्रो अन्य उपग्रहांच्या प्रक्षेपणामध्ये व्यस्त असल्यामुळे चांद्रयान-२ मोहिमेच्या कामावर परिणाम झाला.
‘चांद्रयान-१’ मोहिमेद्वारे दूरनियंत्रक उपकरणाद्वारे चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे व माहिती गोळा करण्यात आली होती. आता ‘चांद्रयान-२’ मोहिमेत लँडर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवून चंद्राचा अभ्यास करण्यात येईल. आधी भारत आणि रशियाची ही संयुक्त मोहिम होती. त्यासाठी रॉसकॉसमॉस ही रशियाची अवकाश संस्था लँडर पुरवणार होती. पण काही कारणांमुळे करार पूर्ण होऊ शकला नाही आणि भारताने स्वबळावर चांद्रयान-२ ची तयारी केली.