भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो उद्या सकाळी श्रीहरीकोटा येथून फेरवापराच्या प्रक्षेपक यानाची म्हणजे स्पेस शटलची चाचणी करणार आहे. अकरा टनांचा हा अग्निबाण हवामान व वारे सुरळित असल्यास अवकाशात झेपावणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष किरणकुमार यांनी सांगितले की, एक्सपिरिमेंटल रियुजेबल लाँच व्हेईकल असे या प्रक्षेपकाचे नाव असून अवकाश क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा खर्च कमी करण्याचा त्यात उद्देश आहे. जर फेरवापराच्या या प्रक्षेपकाचा प्रयोग यशस्वी झाला तर अवकाशात उपग्रह सोडण्याचा खर्च दहा पटींनी कमी होणार आहे. आरएलव्ही म्हणजे इंडियन स्पेस शटल आहे त्यात प्रक्षेपणाचा खर्च कमी असेल, त्यातील हेक्स ०१ तंत्रज्ञानाचा प्रयोग प्रथम केला जात आहे. पंख असलेले अवकाशयान असे त्याचे वर्णन करता येईल व ते अवकाशात जाऊन परत येऊ शकेल. घन इंधनाच्या रॉकेट मोटारवर ते चालवले जाईल. प्रत्यक्षात स्पेस शटल तयार होण्यास अजून बराच कालावधी लागेल. श्रीहरीकोटा येथून आरएलव्ही सोडले जाईल व पंख असलेले अवकाशयान बंगालच्या उपसागरात उतरेल पण नंतरचा टप्पा हे अवकाशयान श्रीहरीकोटा येथील बेटाच्या जमिनीवर उतरावे अशी अपेक्षा राहील. अमेरिकी स्पेस शटल्ससाठी जशा धावपट्टय़ा असतात तशा धावपट्टय़ावर स्पेसशटल उतरेल.
अमेरिकेने स्पेस शटल कार्यक्रम बंद केला असताना आता कुणीच पंख असलेली अवकाशयाने तयार करीत नाही मग भारतालाच अशी गरज का वाटली या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, आमचा उद्देश कमी खर्चात अवकाशात जाणे हा आहे, आणखी संशोधन करून खर्चात कपात करणे शक्य आहे असे आम्हाला वाटते. त्यामुळे उपग्रह सोडण्याचा खर्चही कमी होईल असे वाटते का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, केवळ उपग्रहाचा संबंध नाही एकूणच पायाभूत सुविधांचा खर्च कमी होईल.
आरएलव्हीच्या उड्डाणाबाबत मी निश्चितच उत्साही आहे असे सांगून किरणकुमार म्हणाले की, वायुगतिकीत आम्ही प्रथमच मोठे काम करीत आहोत, या शटलच्या बोगद्यांमध्ये चाचण्या घेतल्या आहेत. त्याची रचना करणे हे अभियंत्यांना आव्हान होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा