सूर्याचा अभ्यास करण्यासाठी कृत्रिम उपग्रह २०२२ च्या तिसऱ्या तिमाहित प्रक्षेपित करणार असल्याची घोषणा भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने केली आहे. ‘आदित्य एल १’ असे या उपग्रहाचे नाव आहे. पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर ‘एल वन’ या पॉईंटवर हा उपग्रह कार्यरत असेल असं ‘मानव अवकाश उड्डाण केंद्र’ ( human spaceflight center )चे संचालक डॉ उन्नीकृष्णन नायर यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केलंय. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये जिथे दोघांची गुरुत्वाकर्षण शक्ती समसमान असते त्या पॉइंटला ‘एल वन’ पॉईंट या नावाने ओळखलं जातं. या ठिकाणाहून सुमारे १५०० किलो वजनाचा ‘आदित्य एल वन’ उपग्रह विविध संवेदक आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून सूर्याचा अभ्यास करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आदित्य’ मोहिम ही पूर्णपणे वैज्ञानिक मोहिम असणार आहे. पण त्या आधी आणखी एक वैज्ञानिक मोहिम हाती घेत असल्याची माहिती डॉ नायर यांनी दिली आहे. ‘X-PoSat’ही आणखी एक अवकाश दुर्बीण इस्त्रो पुढल्या वर्षी २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीत अवकाशात पाठवणार आहे. अवकाशातील ‘वैश्विक क्ष किरण’ च्या स्त्रोताचा अभ्यास ही अवकाश दुर्बीण करणार आहे.

विशेष म्हणजे ‘X-PoSat’ ही अवकाश दुर्बीण इस्त्रोच्या नव्या प्रक्षेपकासह प्रक्षेपित केली जाणार आहे. Small Satellite launch Vehicle ( SSLV ) असे या नव्या प्रक्षेपकाचे नाव असून या वर्षाअखेरीस याचे उड्डाण नियोजित केले आहे. या प्रक्षेकामुळे अत्यंत कमी वेळेत तयारी करत ३०० किलोग्रॅम वजनापर्यंतचे उपग्रह हे ५०० किलोमीटर उंचीपर्यंत पाठवणे शक्य होणार आहे.

२०२०-२१ या काळांत तब्बल २० अवकाश मोहिमांचे नियोजन इस्त्रोने केले होते. मात्र करोनोनामुळे जेमतेम ४ उपग्रह प्रक्षेपण मोहिमा या शक्य झाल्यात. तेव्हा येत्या काळात अवकाश मोहिमांना वेग येईल अशी अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isro to send artificial satellite aditya l1 to study the sun asj82