मंगळावर जीवसृष्टीची शक्यता अजमावण्यासाठी भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेने (इस्रो) महत्त्वाकांक्षी मोहीम आखली आहे. त्यासाठी साडेचारशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केवळ ‘पीएसएलव्ही- सी २५’ प्रक्षेपकासाठी एकशे दहा कोटी रुपये खर्च आला आहे.
कोठेही जीवसृष्टी अस्तित्वात येण्यासाठी मिथेन या वायूची गरज असते. तेव्हा जगाला आकर्षित करणाऱ्या मंगळावरही या मिथेनचे अस्तित्व तपासण्यासाठी इस्रोने विशेष ‘सेन्सर’ तयार केले आहेत. यांच्या मदतीने मंगळावर यापूर्वी जीवसृष्टी होती का किंवा भविष्यात तेथे जीवसृष्टी विकसित करणे शक्य आहे का, याचा उलगडा होणार आहे, असे ‘मार्स ऑर्बिटर मिशन’चे (एमओएम) प्रकल्प संचालक अरुणन् यांनी सांगितले.
ही मंगळ मोहीम येत्या २१ ऑक्टोबर रोजी सुरू करण्याचा इस्रोचा मानस आहे. मात्र, हवामानावर ते बरेचसे अवलंबून आहे, असे इस्रोच्या मंगळ मोहिमेचे संचालक एम. अण्णादुराई यांनी सांगितले. २१ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत ही मोहीम सिद्ध व्हावी अशी अपेक्षा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रवास मंगळाचा
श्रीहरीकोटावरून अंतराळयान सोडल्यानंतर सुमारे २० ते २५ दिवस यान पृथ्वीभोवती फिरणार आहे आणि त्यानंतर ते मंगळाच्या वारीवर निघेल. नऊ महिन्यांच्या प्रवासानंतर हे मंगळाच्या कक्षेत पोहोचणार आहे. मंगळाभोवती यानाच्या प्रवासाचा किमान कालावधी हा सहा महिन्यांचा असेल, पण त्यात वाढ होईल अशीच चिन्हे आहेत. हे यान अगदी सहा ते सात वर्षेही अंतराळात वावरू शकेल, असे अरुणन् यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isro unveils orbiter for mars mission launch in oct nov
Show comments