बंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) २९ जानेवारीला सोडलेल्या ‘एनव्हीएस-०२’ या दळवळण उपग्रहामध्ये तांत्रिक अडथळे आले आहेत असे ‘इस्रो’च्या सूत्रांनी सांगितले. जीएसएलव्ही-एफ१५ या भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान प्रक्षेपकाने सोडलेला ‘एनव्हीएस-०२’ त्याच्या नियोजित कक्षेत स्थिरावला होता. मात्र, त्याची कक्षा उंचावण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही असे सूत्रांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘एनव्हीएस-०२’चे प्रक्षेपण ही ‘इस्रो’ची शतकी कामगिरी असल्यामुळे त्याकडे देशवासीयांचे विशेष लक्ष होते. उड्डाण यशस्वी होऊन उपग्रह नियोजित कक्षेत पोहोचल्याचे ‘इस्रो’ने जाहीर केले होते. मात्र, आता त्यामध्ये तांत्रिक अडथळे आल्याचे ‘इस्रो’च्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे त्याचे कक्षा उंचावण्याच्या हालचाली बंद झाल्या आहेत. “उड्डाणानंतर उपग्रहाचे सौर पॅनेल यशस्वीरित्या कार्यरत झाले आणि ऊर्जा निर्मिती नाममात्र आहे. उपग्रहाचे जमिनीवरील स्थानकाशी संभाषण प्रस्थापित करण्यात आले आहे. मात्र, त्यापुढील नियोजित कक्षेत उपग्रह जाण्याचे काम झाले नाही कारण वरील कक्षेत झेप घेण्यासाठी थ्रस्टरला बळ देम्यासाठी ऑक्सिडायझर दाखल करून घेण्यासाठी झडपा उघडल्या नाहीत,” असे ‘इस्रो’ने सांगितले. ‘इस्रो’मधील सूत्रांनी सांगितले की उपग्रह कक्षेत पोहोचल्यानंतर तो पुढे झेपावण्यास अपयशी ठरला. “उपग्रहाच्या प्रणाली निरोगी असून सध्या तो लंबवर्तुळाकार कक्षेत आहे. या लंबवर्तुळाकार कक्षेत दळणवळणासाठी उपग्रहाचा वापर करण्याच्या पर्यायी मोहिमेचा विचार केला जात आहे,” असे ‘इस्रो’ने स्पष्ट केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isros 100th mission hits hurdle as nvs 02 satellite faces technical glitch zws