भारतीय अवकाश संशोधन संस्थेसाठी (इस्रो) नव्या वर्षांतला पहिला रविवार धवल यशाचा ठरला. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेल्या क्रायोजेनिक इंजिनाच्या बळावर अवकाशात झेपावलेल्या जीएसएलव्ही डी-५ने जीसॅट-१४ हा उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करताच इस्रोच्या वैज्ञानिकांनी एकज जल्लोष केला. गेल्या दोन दशकांची त्यांची तपश्चर्या फळाला आली! या यशापाठोपाठ अंतराळात मानव पाठवण्याच्या मोहिमेचे दारही भारतासाठी खुले झाले आहे.
तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत किचकट असलेल्या क्रायोजेनिक इंजिनाच्या निर्मितीसाठी गेल्या दोन दशकांपासून इस्रोचे वैज्ञानिक झटत होते. २०१० मध्ये एकापाठोपाठ एक असे दोनदा आलेले अपयश आणि गेल्याच वर्षी मोक्याच्या क्षणी निर्माण झालेली तांत्रिक अडचण यामुळे क्रायोजेनिक इंजिनाबाबतचे यश इस्रोला सातत्याने हुलकावणी देत होते. या पाश्र्वभूमीवर रविवारचे प्रक्षेपण महत्त्वाचे होते. रविवारी दुपारी ४ वाजून १८ मिनिटांनी जीएसएलव्ही डी-५ अवकाशात झेपावले आणि अवघ्या १७ मिनिटांतच त्याने जीसॅट-१४ या भूस्थिर उपग्रहाचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले. संपर्कव्यवस्था अत्याधुनिक करण्यासाठी जीसॅट-१४ उपयुक्त ठरणार आहे. याआधी रशियाने भारताला सात क्रायोजेनिक इंजिनांचा पुरवठा केला होता. त्यातील सहाचा वापर इस्रोने केला. मात्र, आर्थिक कारणास्तव रशियाला क्रायोजेनिक इंजिनांचा पुरवठा करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे इस्रोच्या संशोधकांनी स्वदेशी बनावटीचे इंजिन तयार करण्याचा चंग बांधला होता.
जीएसएलव्ही डी-५च्या यशामुळे आता भारतही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात प्रवेश मिळवू शकणार आहे. अवकाशासंबंधी प्रमुख प्रयोगांसाठी या स्थानकाचा वापर केला जातो. आतापर्यंत अमेरिका, रशिया, फ्रान्स व चीन यांचीच या स्थानकावर मक्तेदारी होती. मात्र, आता भारतही त्यात सहभागी होऊ शकतो.
मानाचे स्थान
क्रायोजेनिक इंजिनाचे तंत्रज्ञान विकसित केल्यामुळे भारताला आता अमेरिकेसह रशिया, जपान, फ्रान्स व चीन या क्रायोजेनिक इंजिनाच्या निर्मितीत अग्रेसर असलेल्या प्रगत देशांच्या पंक्तीत स्थान मिळाले आहे.
इस्रोच्या संशोधकांनी एक अत्यंत अवघड जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. या सगळ्यांचा मला अभिमान आहे. क्रायोजेनिकविषयी आम्ही जी अपेक्षा बाळगली होती, ती आज सुफळ संपूर्ण झाली. आमचे हे यश राष्ट्राला अर्पण करण्यास मला समाधान वाटत आहे.
के. राधाकृष्णन, इस्रोचे अध्यक्ष
मोहिमेची वैशिष्टय़े
*जीएसएलव्हीची उंची : ४९.१३ मीटर
*जीसॅटचे वजन : एक हजार ९८२ किलो
*उपग्रह वाहून नेण्याची क्षमता अडीच टन
*एकूण खर्च : ३६० कोटी रुपये
फसलेल्या मोहिमा
एप्रिल, २०१०
डिसेंबर, २०१०
ऑगस्ट, २०१३