ISRO – इस्रोची महत्त्वकांक्षी मोहिम म्हणून चांद्रयान ३ कडे बघितले जात आहे. चंद्रावर अलगद यान उतरवणे आणि त्यामधून रोव्हरने बाहेर येत चांद्र भूमीवर संचार करणे अशी ही मोहिम असणार आहे. ही मोहिम यशस्वी झाली तर चंद्रावर रोव्हर धावणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. याआधी रशिया, अमेरिका आणि चीनने ही तंत्रज्ञानाची कमाल केली आहे.
२०१९ च्या जुलैमध्ये चांद्रयान २ मेहिमेत इस्रोने असाच प्रयत्न केला होता. एक उपग्रह चंद्राभोवती प्रक्षेपित केला होता, जो अजुनही चंद्राभोवती फिरत असून चंद्राचा नकाशा तयार करण्याचे तसंच चंद्रावरील खनिज-मुलद्रव्य, चंद्राभोवती असलेल्या अवकाशातील घडामोडींबद्दलची माहिती गोळा करत आहे. या मोहिमेत चंद्रावर ‘विक्रम’ नावाचा लँडर – यान उतरवण्याचा प्रयत्न केला. याच लँडरमधून ‘प्रज्ञान’ नावाचा रोव्हर बाहेर पडणार होता. मात्र विक्रम यान अलगद न उतरता चंद्रावर आदळले होते आणि त्याचे तुकडे झाले होते.
चांद्रयान ३ मोहिम कशी आहे?
आता चांद्रयान ३ मोहिमेच्या माध्यमातून हाच प्रयत्न इस्रो करणार आहे. यावेळी सुमारे १७५२ किलो वजनाा लँडर हा चांद्र भूमीवर उतवण्याचा प्रयत्न इस्रो करणार आहे. यामध्ये २६ किलो वजनाचा रोव्हर नंतर चांद्रभूमीवर संचार करणार असं नियोजन आहे. इस्रोचा शक्तीशाली प्रक्षेपक, ज्याला बाहुबली यानावानेही ओळखले जाते अशा LVM3 मधून हे चांद्रयान ३ चंद्राकडे धाडले जाणार आहे. चंद्रावर लँडर-यान आणि रोव्हर उतरवत चांद्र भूमीचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यााचा इस्रोचा प्रयत्न असणार आहे. एकुण १४ दिवस रोव्हर चंद्राच्या भूमीवरचा संचार करेल असेही नियोजन आहे.
हेही वाचा… ISRO GSLV Launch : इस्रोचे आणखी एक यशस्वी प्रक्षेपण, अत्याधुनिक NVS-01 उपग्रह नियोजित कक्षेत
आत्तापर्यंत ही मोहिम कधी प्रत्यक्षात येणार याची फक्त चर्चा सुरु होती. आज ( सोमवारी ) इस्त्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी ही मोहिम जुलै महिन्यात प्रत्यक्षात येणार असल्याचं जाहिर केलं आहे. पण जुलै महिन्यात नक्की कधी याची घोषणा जरी केली नसली तरी १२ जुलै ला चांद्रयान ३ अवकाशात झेप घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर सर्व काही सुरळीत झाले तर २३ ऑगस्टला चांद्रयान ३ मधील लँडर हे चंद्रावर उतरवण्याचा प्रयत्न असणार आहे.