Ayodhya Ram Mandir Opening Ceremony: अयोध्येमध्ये आज राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सोहळ्याच्या तयारीनिमित्त अयोध्येमध्ये वेगवेगळ्या कामांची रेलचेल पाहायला मिळत होती. आज प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील विविध क्षेत्रांमधल्या नामवंत व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामध्ये क्रीडा, कला, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्यानगरी व राम मंदिराचे आकर्षक फोटो व व्हिडीओ लोकांचं लक्ष वेधून घेत असतानाच आता राम मंदिराच्या अवकाशातून काढलेल्या छायाचित्रांची चर्चा सुरू झाली आहे. इस्रोनं अवकाशातून अयोध्यानगरी व राम मंदिराची काढलेली छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहेत.
काय आहे फोटोमध्ये?
इस्रोनं अयोध्येच्या काढलेल्या या फोटोंमध्ये मंदिर व आसपासचा एकूण २.७ एकरचा परिसर स्पष्टपणे दिसत आहे. राम मंदिर बांधकाम चालू असतानाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. केंद्र सरकारने माय गव्हर्नमेंटच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अयोध्येतील राम मंदिरापासून जवळच असलेला दर्शन महल आणि बाजूने वाहणारी शरयू नदीही दिसत आहे. त्याचबरोबर नव्यानेच पुनर्बांधणी व सुशोभिकरण करण्यात आलेलं अयोध्या रेल्वे स्थानकही या फोटोंमधून दिसून येत आहे.
सध्या भारताचे किमान ५० उपग्रह अवकाशात असून त्यातले काही उपग्रह एक मीटरहून कमी अंतराचे अतिशय स्पष्ट असे फोटो काढण्यासाठी सक्षम आहेत. इस्रोनं काढलेली ही छायाचित्रे हैदराबादमधील नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये प्रक्रिया करून अधिक सुस्पष्ट करण्यात आली आहेत.
अयोध्येमध्ये मान्यवरांची मांदियाळी
दरम्यान, अयोध्येमध्ये देशभरातून मान्यवरांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी उपस्थिती लावली आहे. देशभरातील शेकडो मान्यवरांला या सोहळ्यासाठीची आमंत्रणे पाठवण्यात आली होती. या मान्यवरांना प्रभू श्रीराम यांच्याशी निगडीत काही वस्तू भेट म्हणून देण्यात येणार आहेत.