आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडण्यासाठी आता आयकर विभागाने एक अर्ज भरण्याचा पर्याय दिला आहे. हा अर्ज भरूनही तुम्ही तुमचे आधार आणि पॅन कार्ड लिंक करू शकता, आयकर विभागानेच आज ही माहिती दिली आहे. आधार कार्ड आणि पॅनकार्ड हे एकमेकांशी जोडणे अनिवार्य आहे. अशात अनेकांना ते लिंक करताना वेबसाईट हँग होणे, वेबसाईट ओपन न होणे या आणि अशा समस्या येत होत्या. याबाबतच्या काही तक्रारी आणि ट्विट्सही आयकर विभागाकडे नोंदवण्यात आले. ज्यानंतर आयकर विभागाने आता एक पानाचा अर्ज भरून आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्याचा पर्याय आणला आहे.
सध्या पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी ऑनलाईन आणि एसएमएस असे दोन पर्याय आहेत. मात्र आता आयकर विभागाने अर्ज भरण्याचाही पर्याय समोर आणला आहे. या अर्जावर अर्जदारांना आपला पॅन नंबर आणि आधार क्रमांक अचूक पद्धतीने नमूद करायचा आहे. त्यानंतर आपले नावही अचूक भरायचे आहे. माझे आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यात यावे अशा आशयाची एक प्रतिज्ञाही नमूद करण्यात आली आहे, त्यावर अर्ज भरणाऱ्याला स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे.
सरकारने १ जुलैपासून आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे सक्तीचे केले आहे, ते लिंक न केल्यास आयकर भरता येणार नाही, असेही सरकारने म्हटले आहे. आधार कार्ड आणि पॅनसोबत लिंक करण्यासाठी http://www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला नोंदणी करावी लागेल.
त्यानंतर तुम्हाला आधार आणि पॅन लिंक करण्याची लिंक येईल. या लिंकमध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे. ज्यानंतर तुमचे आधार आणि पॅन एकमेकांशी जोडले जाईल. १ जुलैपर्यंत जे पॅन आणि आधार लिंक करणार नाहीत त्यांचे पॅन कार्ड बाद ठरवण्यात येईल असाही निर्णय सरकारने घेतला होता. मात्र हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे. मात्र ते करणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे आता ज्यांना पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी ऑनलाईन किंवा एसएमएसचा पर्याय वापरताना अडचणी येत आहेत त्यांना एक अर्ज भरूनही, पॅन आणि आधार जोडता येणार आहे.