भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती समूहाने व्यावसायिक उलाढालीत ७ कोटी रूपयांचा  कर चुकवल्याचे प्राप्तिकर खात्याने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.प्राप्तिकर विभागाने पूर्ती पॉवर अँड शुगर लिमिटेड या कंपनीच्या गेल्या दोन वर्षांतील प्राप्तिकराच्या विवरणाची तपासणी पूर्ण केली असून या कंपनीने सात कोटी रूपयांचा कर चुकवल्याचे त्यात स्पष्ट झाले आहे.
पूर्ती समूहाने  प्रतिक्रिया व्यक्त करताना असे म्हटले आहे की, याबाबत आम्हाला कुठलीही नोटीस मिळालेली नाही. एखादी नोटीस मिळणे म्हणजे गैरप्रकार झाल्याचे निदर्शक असत नाही. गडकरी हे गेल्या दोन वर्षांपासून पूर्ती समूहाशी संबंधित नाहीत. पूर्ती समूहाचे जनसंपर्क अधिकारी नितीन कुलकर्णी यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांत प्राप्तिकर बुडवल्याच्या आरोपावरून पूर्ती समूहाला नोटीस पाठवण्यात येत असल्याच्या बातम्या आल्या आहेत. पण आमच्या मते पूर्ती समूहाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला अशा प्रकारची नोटीस मिळालेली नाही.
जर प्राप्तिकर विवरणाबाबत नोटीस मिळाली असती तर आमचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर दिवे यांनी आमच्या कर सल्लागारांशी चर्चा करून त्याला प्रतिसाद दिला असता. अशी नोटीस मिळाली तरी त्यावर अपील करण्याचे वेगवेगळे टप्पे आहेत, पूर्ती समूह त्याबाबत योग्यवेळी निर्णय घेईल. कर विवरणाबाबत नोटीस मिळणे हे गैरप्रकार केल्याचे निदर्शक असत नाही. नितीन गडकरी हे गेल्या दोन वर्षांपासून पूर्ती समूहाशी संबंधित नाहीत, असे कुलकर्णी यांनी  सांगितले.
प्राप्तिकर खात्याने पूर्ती समूहाच्या कागदपत्रांची अंतिम छाननी सुरू केली आहे, बाकीची तपासणी वर्षअखेरीस पूर्ण केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. अंतिम विवरण आदेश तयार करताना प्राप्तिकर खात्याने पूर्ती समूहाचे इतर अधिकारी तसेच नितीन गडकरी यांनी केलेले निवेदन विचारात घेतले आहे.

Story img Loader