IT Manager Manav Sharma Suicide Case : पत्नीवर छळ केल्याचा आरोप करत उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका आयटी कंपनीमधील मॅनेजरने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतःचे जीवन संपवण्यापूर्वी मानव शर्मा या व्यक्तीने एक भावनिक व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे ज्यामध्ये तो गळ्यात दोरीचा फास लावून रडताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये शर्मा हा त्याच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करताना दिसत आहे.

दरम्यान पीडित व्यक्तीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून आतापर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान हे प्रकरण उजेडात आल्यानंतर याची तुलना काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेल्या बंगळुरू येथील अतुल सुभाष प्रकरणाशी केली जात आहे.

दरम्यान व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मानव शर्मा हा गळ्यात फास अडवून रडताना दिसत आहे. तसेच “पुरुषांबद्दल विचार करा” अशी विनंती तो प्रशासनाकडे करत आहे. तसेच तो इशारा देताना दिसतो की जर का कायद्याने पुरुषांचे रक्षण केले नाही तर आरोप करण्यासाठी भविष्यात पुरुष शिल्लक राहाणार नाहीत. माझ्या पालकांना धक्का लावू नका, असेही मानव याने त्याच्या व्हिडीओच्या शेवटी सांगितले.

शर्मा याने आपण यापूर्वी देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा खुलासा केला आहे. त्याने मनगटावरील जखमांचे व्रण देखील दाखवले. दरम्यान मानव शर्मा याच्या वडिलांनी सदर पोलीस ठाण्यात आपल्या मुलाच्या मृत्यूसाठी सुनेला जबाबदार धरत गुन्हा दाखल केला आहे.

पत्नीने आरोप फेटाळले

मानव शर्माच्या पत्नीने मात्र तिच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. तसेच तिने आरोप केला आहे की तिच्या पतीला दारूचे वेसण होते आणि त्याने यापूर्वीही स्वत:ला इजा करण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता.

“तो प्रचंड प्रमाणात मद्यपान करत असे आणि त्याने यापूर्वी अनेकदा आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले आहेत. मी तीन वेळा वाचवले. मद्य घेतल्यानंतर तो मला मारहाण देखील केली आहे. मी सासरच्यांना अनेकदा याबद्दल सांगितले, पण त्यांनी मा‍झ्या विनंतीकडे दुर्लक्ष केले,” असे मानव शर्माच्या पत्नीने सांगितले.

विवाहबाह्य संबंधांबद्दलच्या आरोपांवर बोलताना मानव शर्माच्या पत्नीने सांगितले की, “ते सर्व आमच्या लग्नाच्या आधी होते. मी त्याच्याशी लग्न केल्यानंतर असं काहीही घडलं नाही. दरम्यान आग्रा पोलिसांनी सांगितले की या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

एसपी विनायक गोपाल म्हणाले की, “आग्रा येथील मिलिटरी रुग्णालयातून आम्हाला माहिती मिळाली की मानव नावाच्या व्यक्तीला मृत अवस्थेत आणण्यात आले आहे. नंतर लक्षात आले की त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.”

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडित व्यक्तीचे पोस्ट मार्टम करण्यात आल्याचीही माहिती दिली.

“त्याचा मोबाईल फोल लॉक होता, पण त्याच्या बहिणीला पासवर्ड माहिती होता. फोन अनलॉक केल्यानंतर त्यामध्ये एक व्हिडीओ आढळून आला. या व्हिडीओमधून उघड झाले की त्याचे पत्नीबरोबरचे संबंध तणावपूर्ण होते, ज्यामुळे त्याने स्वतःचे जीवन संपवले”, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.

Story img Loader