माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना निराश करणारे वृत्त आहे. चालू आर्थिक वर्षात या क्षेत्रातील नोकऱ्यांच्या उपलब्धतेत २० टक्क्यांनी घट होईल, असा अंदाज ‘नॅसकॉम’ने वर्तविला आहे. या क्षेत्रातील देशातील दोन दिग्गज कंपन्या इन्फोसिस आणि टीसीएसने ‘ऑटोमेशन’वर भर दिल्यामुळे त्याचा परिणाम नोकऱ्यांच्या उपलब्धतेवर होईल, असे नॅसकॉमच्या अहवालात म्हटले आहे.
गेल्यावर्षी जूनमध्ये नॅसकॉमने २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये २.७५ लाख नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, असा अंदाज वर्तविला होता. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षामध्ये तो २.३० लाख इतका होता.
नॅसकॉमचे अध्यक्ष सी. पी. गुरनानी म्हणाले की, एकूणच देशातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा १० ते ११ टक्क्यांने या आर्थिक वर्षात विकास होईल. डिजिटल क्षेत्रामध्ये आता ऑटोमेशनला महत्त्व येऊ लागले आहे. ऑटोमेशन वाढू लागल्यामुळे साहजिकच रोजगाराच्या संधी कमी होऊ लागणार आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत विचार केला तर नोकरीच्या संधी कमी होणार आहेत. पण त्याचा कंपन्यांच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुंबईस्थित सेंट्रम ब्रोकिंगने दिलेल्या अहवालात देशातील इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, एचसीएल आणि कॉग्निझंट या पाचही दिग्गज आयटी कंपन्यांनी २०१५ मध्ये एकत्रितपणे कर्मचारी कमी भरले होते. हे प्रमाण २४ टक्क्यांवर होते. ऑटोमेशनकडे वळल्यामुळे कर्मचारी भरती कमी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा