नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला WhatsApp ने भारताचा चुकीचा नकाशा शेअर केल्याने वाद निर्माण झाला होता. मात्र केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी झापल्यानंतर WhatsApp ने हा चुकीचा नकाशा डिलिट केला. राजीव चंद्रशेखर यांनी WhatsApp ला खडे बोल सुनावले आहेत. भारतात काम करायचं असेल तर देशाचा योग्य नकाशाच फॉलो करावा लागेल असं म्हणत त्यांनी या कंपनीची शाळा घेतली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला व्हॉट्सअॅपने भारताचा चुकीचा नकाशा शेअर केला होता.
नेमकं काय घडलं प्रकरण?
नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी बारा वाजण्याची वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही न्यू इयर इव्ह साजरी करत असताना लाइव्ह स्ट्रिमिंग पाहू शकता आणि हे ठरवू शकता की तुम्हाला कुठल्या वेळी कुणाला नव्या वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. असं व्हॉट्सअॅपने भारताचा मॅप शेअर करत म्हटलं होतं. मात्र जो नकाशा भारताने शेअर केला होता तो चुकीचा होता. त्यावर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी व्हॉट्स अॅपला ताकीद दिली. व्हॉट्सअॅपच्या लाइव्ह स्ट्रीममध्ये भारताचा चुकीचा नकाशा दाखवला गेला होता.
काय म्हणाले राजीव चंद्रशेखर?
WhatsApp ने जो भारताचा नकाशा लाइव्ह स्ट्रीमध्ये पोस्ट केला आहे तो सगळ्या ठिकाणाहून तातडीने बदलावा. तुम्हाला जर भारतात राहून व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला भारताचा योग्य नकाशाच दाखवावा लागेल. अशा शब्दात राजीव चंद्रशेखर यांनी WhatsApp ला झापलं. कारण व्हॉट्सअॅपने जो नकाशा शेअर केला होता त्यामध्ये त्यांनी POK आणि चीन दावा करत असलेले काही भाग हे भारतापासून वेगळे दाखवले होते. यावरूनच राजीव चंद्रशेखर यांनी तातडीने बदल करण्याच्या सूचना WhatsApp ला दिल्या. त्यांनी यासाठी मेटा आणि फेसबुकलाही टॅग केलं. त्यानंतर काही वेळातच चुकीचा नकाशा WhatsApp ने हटवला. तसंच दिलगिरीही व्यक्त केली.
राजीव चंद्रशेखर यांना WhatsApp ने काय उत्तर दिलं?
आमची चूक आम्हाला तुम्ही लक्षात आणून दिलीत त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो आहोत. आम्ही आमचं लाइव्ह स्ट्रिमिंग रिमूव्ह केलं आहे आणि जी चूक आमच्याकडून झाली त्याबद्दल आम्ही माफी मागतो आहोत. भविष्यात आमच्याकडून अशा प्रकारची चूक होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ असंही WhatsApp ने राजीव चंद्रशेखर यांना दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे.
राजीव चंद्रशेखर यांनी हे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री आहेत. त्यांनी WhatsApp ला त्यांची चूक लक्षात आणून देत जे खडे बोल सुनावले त्याचं कौतुक सोशल मीडियावर होतं आहे. WhatsApp नेही चूक लक्षात येताच दिलगिरी व्यक्त करत लाइव्ह स्ट्रिमिंगमधून भारताचा चुकीचा नकाशा डिलिट केला आहे.