उत्तर प्रदेशमधील वाराणसी आणि जौनपुरमध्ये आयकर विभागाच्या तुकड्यांनी मोठी कारवाई केलीय. अनेक ज्वेलर्सच्या घरांवर आणि दुकानांवर आयकर विभागाने धाडी टाकल्यात. यापैकी काहीजण राजकीय पक्षांना आणि नेत्यांना बेकायदेशीर पद्धतीने कोट्यावधी रुपयांची मदत करण्याच्या प्रयत्न असल्याचा दावा केला जातोय. उत्तर प्रदेशमध्ये आचार संहितेचं उल्लंघन करत कोट्यावधी रुपयांचे व्यवहार गैरकायदेशीररित्या सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर आयकर विभागाने ही कारवाई केली. आज (३१ जानेवारी २०२२ रोजी) सकाळी आठ वाजता आयकर विभागाच्या तुकड्यांनी एकाचवेळी अनेक ठिकाणी छापेमारी केली. या ज्वेलर्ससंदर्भातील माहिती काही दिवसांपूर्वीच मिळाली होती आणि पूर्ण खात्री झाल्यानंतर विभागाने कारवाई केल्याचा दावा खात्याशीसंबंधित सुत्रांनी केलाय.
समोर आलेल्या माहितीनुसार गहना कोठी ज्वेलर्स, कृतिकुंज ज्वेलर्सवर आयकर विभागाने छापे घातले आहेत. गहना कोठी ज्वेलर्स हे जौनपुरमधील सर्वोत्तम दर्जाचं सोनं विकणारे म्हणून जाहिरात करतात. या ज्वेलर्सच्या दुकानाची मालकी सध्या विनीत सेठ यांच्यासहीत त्यांच्या कुटुंबीयांकडे आहे.
कृतिकुंज ज्वेलर्सचे मालक नन्हेलाल वर्मा असून त्यांच्या घरावरही आयकर विभागाने छापेमारी केलीय. अनेक कागदपत्रांबरोबरच गैरव्यवहारांसंदर्भातील अन्य काही पुरावे या ठिकाणी मिळतात का याचा तपास केला जातोय.
कृतिकुंज ज्वेलर्सचे मालक असणाऱ्या नन्हेलाल वर्मा यांच्या जावयाविरोधातही सहा महिन्यांपूर्वी केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच सीबीआयने बेकायदेशीर संपत्तीच्या प्रकरणामध्ये छापेमारी केली होती. नन्हेलाल वर्मांचे जावई रेल्वेमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या छापेमारीमध्ये बरेच पुरावे सीबीआयच्या हाती लागले होते.
सध्या सुरु असणाऱ्या छापेमारीमध्ये कोणकोणते पुरावे आणि संपत्ती हाती लागलीय याचा अधिकृत खुलासा मंगळवारी सायंकाळी किंवा छापेमारीची कारवाई संपल्यानंतरच केला जाईल. सध्या तरी या ठिकाणी आयकर विभागाला अनेक बेकायदेशीर व्यवहारांचे पुरावे मिळाल्याचं न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. याच आधारे पुढील तपास सुरु आहे.