बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत असून येथे जणू पुन्हा एकदा ‘लालुराज’ आल्याचे दिसत आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी पाटणा येथे मंगळवारी केली. भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, असेही ते म्हणाले.
कोणतेही सरकार हे नैतिकतेवर चालते, पोलिसी बळाच्या आधारे राज्य करणे चुकीचे आहे. गेल्या महिन्यात बागाहा येथील आदिवासी भागात पोलिसांनी केलेला गोळीबार या सरकारसाठी लांच्छनास्पद आहे.
नेहमी शांत असणाऱ्या या भागात अशी दंडेली करून सरकारने काय साध्य केले, या सरकारला सत्तेत राहाण्याचा नैतिक अधिकार नाही, असे राजनाथ म्हणाले. गेल्या महिन्यात बागाहा आदिवासी भागात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सहा आदिवासी तरुण मारले गेले होते, त्या पाश्र्वभूमीवर ते बोलत होते. बिहार सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ढासळली असून, लालुप्रसाद यादव यांच्या कार्यकाळातील दंडेलशाही नव्याने सुरू झाल्याचे दिसत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Story img Loader