– शिवराज यादव
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आधी निवडणूक लढवण्याचं जाहीर करत नंतर माघार घेतल्याने माढा मतदारसंघ चर्चेत आहे. याठिकाणी भाजपाकडून रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकेकाळी शरद पवारांचा मतदारसंघ असणाऱ्या या माढ्यातील लढाई राष्ट्रवादी आणि भाजपा दोघांसाठीही प्रतिष्ठेची ठरली आहे. सध्या संजय शिंदे यांचं पारडं जड वाटत असलं तरी निकाल काहीही लागू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. ही लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे.
ही मुख्यत्वे फडणवीस आणि शरद पवारांच्या प्रतिष्ठेची लढाई –
माढ्यातील लढाई खासकरुन फक्त राष्ट्रवादी आणि भाजपातच आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने तसंच शरद पवारांनी माघात घेतली असल्या कारणाने राष्ट्वाीसाठी ती अस्तित्वाची आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्याने ती त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली आहे.
प्रादेशिक उमेदवार ठरु शकतो महत्त्वाचा मुद्दा –
माढा मतदारसंघात सोलापुरमधील करमाळा, माळशिरस, माढा आणि सांगोला हे चार तर साताऱ्यातील फलटण आणि माण या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. संजय शिंदे प्रादेशिक उमेदवार असल्याने एक आपला माणूस असल्याच्या नात्याने त्यांना जास्तीत जास्त मतं मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा सोलापुरात तितका परिचय नसल्याने त्याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे. याउलट परिस्थिती साताऱ्यातील दोन्ही ठिकाणी असेल. तिथे संजय शिंदेना फटका बसण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ पत्रकार प्रमोद गोसावी यांनी सांगितल्यानुसार, माढा, करमाळा सांगोला येथून संजय शिंदे यांना १ लाख ते १ लाख २५ हजारांचा मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे. तर माणखटाव येथे १० ते १५ हजार मतांनी ते पिछाडीवर राहतील. तर फलटणची जबाबदारी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर या दोघांनी घेतली आहे. यामुळे त्या ठिकाणी उमेदवार स्थानिक असला तरी त्यांचं राजकीय वैमनस्य यामुळे कटाला कट मिळण्याची शक्यता आहे.
तसं पहायला गेलं तर माढा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. भाजपाने साखर कारखान्यात असणारी अनेक माणसं आपल्या पक्षात घेतली आहेत. मात्र यामुळे त्यांच्यामागे असणारे प्रश्नही भाजपा आपल्यासोबत घेऊन गेले आहेत. यामुळे त्यांची उत्तर देण्याची जबाबदारी आता भाजपावर आहे असं ज्येष्ठ पत्रकार प्रमोद गोसावी सांगतात.
माढा मतदारसंघात अर्धा भाग सिंचन तर अर्धा भाग नेहमी दुष्काळाचा सामना करत असतं अशी भौगोलिक स्थिती आहे. माणखटाव याच्यासह करमाळा, सांगोला तालुक्यातील काही भाग दुष्काळाचा सामना करत आहेत. सिंचन सुविधांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. प्रामुख्याने शेती आणि दुग्धव्यवसाय या भागात केला जातो. सरकारने येथील अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं असून त्यांच्या नाकर्तेपणामुळे संजय शिंदे यांना फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं प्राबल्य दिसत नाही. त्यांचा उमेदवारही बारामातीहून आयात केलेला आहे. तसंच कोणतीही यंत्रणा त्यांच्याकडे नाही. त्यामुळे ही निवडणूक प्रामुख्याने भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशीच आहे.
शेतमालाला भाव मिळत नसल्याचा निवडणुकीवर परिणाम –
माढा तालुक्यात जवळपास सात हजारापेक्षा जनावरं आहेत. पण आजपर्यंत एकही चारा छावणी या ठिकाणी उभी राहिलेली नाही. नोवहेंबरपर्यंत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला आहे. सगळी आणेवारी ५० पैशापेक्षा आत आहे. यामुळे सर्व जबाबदारी सरकारवर आहे. दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करुन सरकारने ती स्विकारलीदेखील आहे. पण असं असूनही अद्याप शेतकऱ्याला दिलासा देण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. कोणतंही धोरण सरकारने आखलं नाही आणि याचा फटका सरकारला बसू शकतो अशी शक्यता येथे वर्तवली जात आहे. हा कळीचा प्रश्न असून याशिवाय कांदा, गहू, ज्वारी आणि इतर शेतमालालाही भाव मिळत नसून याचा थेट परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.