ठाकरे बंधू एकत्र आल्यास आनंदच होईल असे विधान भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सध्या आपल्या भाषणांतून  पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत असल्याच्या पार्श्वभूमीवर दोघेही निवडणुकीनंतर एकत्र येण्याच्या शक्यतेबाबत बोलत असताना व्यंकय्या नायडू म्हणाले की, “ठाकरे बंधू एकत्र आल्यास आनंदच होईल. आम्हाला याबद्दल कोणावरही टीका करायची नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुक्त महाराष्ट्र हा आमचा मुख्य उद्देश आहे.”
आघाडी सरकारने गेल्या १५ वर्षांत महाराष्ट्राला बकाल करुन टाकले आहे. घोटाळेबाज सरकारला कंटाळलेल्या राज्याच्या जनतेनेही यंदा काँग्रेसमुक्त महाराष्ट्राचा संकल्प केला असल्याने राज्यात भारतीय जनता पक्षाचेच(भाजप) बहुमताने सरकार येईल असा ठाम विश्वासही नायडू यांनी यावेळी व्यक्त केला.
गेल्या २५ वर्षांची शिवसेनेसोबतची युती तुटणे ही दुर्दैवी गोष्ट असली तरी, सध्या राज्यात शिवसेनेपेक्षा भाजप ताकदवान असल्यामुळे आम्हाला जागा वाढवून मिळणे अपेक्षित होते. परंतु, तसे न झाल्याने वेगळे लढावे लागले, असेही ते पुढे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत सेनेपेक्षा सहा जास्त जागांवर भाजपला विजय मिळाला. तरीसुद्धा शिवसेनेला युतीत पहिले स्थान देऊन सध्याची परिस्थिती लक्षात घेता आमची याआधीच्या ११९ जागांऐवजी १३० जागांची माफक अपेक्षा होती. उर्वरित सर्व जागा शिवसेनेनेच ठेवाव्यात अशी भूमिकाही आम्ही मांडली. पण, सेनेला हे मंजूर नसल्यामुळे हे सर्व झाले, असेही ते पुढे म्हणाले. तरीसुद्धा आम्हाला शिवसेनेवर कोणतीही टीका करायची नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आमचे खरे विरोधक आहेत आणि यंदा भाजपला महाराष्ट्रात बहुमत मिळेल यात काहीच शंका नाही, असेही नायडू यांनी सांगितले.