इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी शुक्रवारी (२० ऑक्टोबर) त्यांच्या बॉयफ्रेंडपासून वेगळं होत असल्याची घोषणा केली. जॉर्जिया यांचा जोडीदार पत्रकार अँड्रिया जिआमब्रुनो याने अश्लील शेरेबाजी केली होती. यानंतर जॉर्जिया यांनी तब्बल १० वर्षाचं नातं संपवण्याचा निर्णय घेतला. यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी त्यांनी व्यक्तिगत आयुष्यातील चढउतार बाजुला ठेवले आणि जगाची चिंता वाढवणाऱ्या इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतली. तसेच इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी नुकताच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना हमासविरोधातील युद्धात मदतीचं आश्वासन दिलं.
जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या, “हमासच्या हल्ल्यानंतर स्वतःचा आणि आपल्या जनतेचा बचाव करण्याच्या इस्रायलच्या अधिकाराचं आम्ही समर्थन करतो. दहशतवादाशी लढा दिला पाहिजे हे आम्ही अगदी समजू शकतो. हे काम इस्रायल सर्वोत्तमपणे करू शकतो असा आमचा विश्वास आहे. आपण त्या दहशतवाद्यांपेक्षा वेगळे आहोत.”
“या क्रौर्याला पराभूत करावं लागेल”
यावेळी नेतान्याहू म्हणाले, “आपल्याला या क्रौर्याला पराभूत करावं लागेल. हा लढा सभ्यता मानणाऱ्या शक्ती आणि निरपराध नागरिक, मुलं, वयोवृद्ध यांची हत्या आणि बलात्कार करणाऱ्या रानटी शक्तीविरोधात आहे.”
हेही वाचा : हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याशी इराणचा संबंध? अमेरिकेचे सैन्य अधिकारी म्हणाले, “पैसे पुरवणे…”
“ही आपली परीक्षा आणि आपण नक्की जिंकू”
“ही आपली परीक्षा आहे आणि आपण यात नक्की जिंकू. आयसिसविरोधात लढा देणाऱ्या सर्व देशांनी आता हमासविरोधातही उभं राहावं,” असं आवाहन नेतान्याहू यांनी केलं. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली.