मिलान न्यायालयाने एका पत्रकाराला सोशल मीडिया पोस्टमध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची खिल्ली उडवल्याबद्दल ५,००० युरो (५,४६५ डॉलर्स) नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत, अशी बातमी ANSA आणि इतर स्थानिक माध्यमांनी दिली.
अधिक वाचा: केनिया सरकार करणार १० लाख भारतीय कावळ्यांचा संहार; काय आहे नेमकं प्रकरण?
याशिवाय पत्रकार गिउलिया कोर्टेस यांना देखील १,२०० युरोचा निलंबित दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांनी २०२१ साली जॉर्जिया मेलोनी यांच्या उंचीवरून खिल्ली उडवणारे ट्विट (आत्ताचे एक्स) केले होते. या ट्विट पोस्ट मधला मजकूर बॉडी शेमिंग करणारा असल्याचे मानले गेले असून, त्या संदर्भात त्यांना १,२०० युरोचा दंड भरावा लागणार आहे. या निकालासंदर्भात कोर्टेस यांनी गुरुवारी एक्सवर लिहिले की, ‘इटलीच्या सरकारला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पत्रकारितेतील मतभेदांचे वावडे आहे.’ तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर भांडण झाल्यानंतर मेलोनी यांनी कोर्टेस यांच्यावर कायदेशीर कारवाई केली होती.
जॉर्जिया मेलोनी या त्यावेळी विरोधी पक्षाच्या भूमिकेत होत्या. कॉर्टेस यांनी मेलोनी यांची तुलना दिवंगत फॅसिस्ट नेते बेनिटो मुसोलिनी यांच्या बरोबर केली होती. त्यावरून या वादाला वाचा फुटली. याच वेळी सुरु झालेल्या भांडणात कॉर्टेस यांनी प्रतिसाद देताना “तू मला घाबरवू नकोस, जॉर्जिया मेलोनी. शेवटी, तू फक्त १.२ मीटर (४ फूट) उंच आहेस. मी तुला पाहूही शकत नाही” असे म्हटले होते. विविध संकेत स्थळांवर मेलोनी यांची उंची १.५८ ते १.६३ मीटर या दरम्यान असल्याचे म्हटले आहे. कोर्टेस या शिक्षेविरुद्ध अपील करू शकतात. मेलोनी यांच्या वकिलांनी सांगितले की, पंतप्रधान त्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम दान धर्मासाठी वापरतील. गुरुवारी एक्सवरील पोस्टमध्ये कोर्टेस म्हणाल्या की, इटलीमधील स्वतंत्र पत्रकारांसाठी हा कठीण काळ आहे. पुढच्या चांगल्या दिवसांची आशा करूया. आम्ही हार मानणार नाही!
अधिक वाचा: पुरीच्या जगन्नाथ मंदिरात गुप्त भुयार? पुरातत्त्व खात्याकडून होणार पडताळणी..
या वर्षी इटलीमध्ये पत्रकारांविरुद्ध मोठ्या संख्येने खटले दाखल करण्यात आले. त्यामुळे २०२४ च्या जागतिक पत्रकार स्वातंत्र्य निर्देशांकात इटलीला ४६ व्या स्थानावर नेले आहे. पत्रकारांना न्यायालयात नेणे मेलोनी यांना नवीन नाही. २०२१ मध्ये बेकायदेशीर इमिग्रेशनवरील त्यांच्या कठोर भूमिकेबद्दल रॉबर्टो सॅव्हियानोने टीका केल्यामुळे गेल्या वर्षी रोम न्यायालयाने बेस्ट-सेलिंग लेखक रॉबर्टो सॅव्हियानो यांना १,००० युरो आणि कायदेशीर खर्चाचा दंड ठोठावला होता.