पीटीआय, वॉशिंग्टन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक पातळीवरील पुराणमतवादी लोकांकडे पाहण्याचे डाव्या विचारसरणी पालन करणाऱ्यांचे धोरण दुटप्पी असल्याची टीका इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी रविवारी केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझ्यासारखे नेते एकत्र आल्यावर हा लोकशाहीसाठी धोका आहे असे डावे म्हणतात. तेच डाव्या विचारसरणीचे नेते एकत्र येतात तेव्हा त्यांची प्रशंसा केली जाते, अशा शब्दांमध्ये मेलोनी यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

वॉशिंग्टन येथे सुरू असलेल्या ‘कॉन्झर्व्हेटिव्ह पॉलिटिकल अॅक्शन कॉन्फरन्स’ (सीपीएसी) या परिषदेमध्ये मेलोनी रोम येथून दूरदृश्य प्रणालीने सहभागी झाल्या. त्यावेळी बोलताना त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची स्तुती केली आणि त्यांच्या विजयामुळे डावे निराश झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली. मेलोनी म्हणाल्या की, ‘‘१९९०च्या दशकात जेव्हा अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी जागतिक पातळीवर डाव्या उदारमतवादी नेत्यांचे जाळे तयार केले, तेव्हा त्यांना मुत्सद्दी नेते म्हटले गेले. आज जेव्हा ट्रम्प, मेलोनी, अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेव्हियर मिलेई किंवा मोदी एकमेकांशी बोलतात तेव्हा त्यांना लोकशाहीसाठी धोका म्हटले जाते. हा दुटप्पीपणा झाला.’’ पण आम्हाला या दुटप्पीपणाची सवय झाली आहे आणि त्यांनी आमच्यावर कितीही चिखलफेक केली तरी आता लोक त्यांच्या खोटारडेपणावर विश्वास ठेवत नाहीत. ते आम्हालाच मत देतात, अशा तिखट शब्दांमध्ये मेलोनी यांनी डाव्या उदारमतवादी नेत्यांवर टीका केली. युक्रेनवरून अमेरिका आणि युरोपमध्ये तणाव वाढला असला तरी दोन्ही गट एकत्र राहतील, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.