सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत इटलीचे दोघे नौसैनिक भारतात परतले तर त्यांना फाशीची शिक्षा दिली जाणार नाही आणि अटकही होणार नाही, अशी लेखी हमी भारताने दिली आहे. परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनीच संसदेच्या उभय सभागृहात ही माहिती दिली. दरम्यान भारताने मृत्यूदंडाची शिक्षा न देण्याची हमी दिल्यानंतर इटलीचे दोन नौसैनिक भारतामध्ये परतले आहेत.
आपल्या नौसैनिकांना फाशी दिली जाईल, अशी इटलीला धास्ती होती. त्याबाबत त्यांच्याशी मुत्सद्दी पातळीवर समाधानाकारक चर्चा झाली, असे खुर्शीद यांनी सांगितले. भारतीय कायद्यानुसार हे प्रकरण फाशीला वाव देणारे नाही, असे समजावल्यानंतरच हा तिढा सुटला, असेही त्यांनी नमूद केले.
विरोधकांची टीका
सर्वोच्च न्यायालयाच्या कणखर भूमिकेमुळेच इटलीला आपल्या नौसैनिकांना भारताच्या हवाली करावे लागत असताना सरकार मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर लाळघोटेपणाचे दर्शन घडवित आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.
भाजप प्रवक्ते शाहनवाज हुसेन म्हणाले, हा न्यायाच्या विजयाचा दिवस आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम मुदत दिल्यानेच ते नौसैनिक परतत आहेत. आपल्या प्रयत्नांनी हे दोघे परतत आहेत, अशी शेखी सरकार मिरवत आहे तर मग दाऊद इब्राहिमला आणण्यात त्यांना अपयश का येत आहे, असा सवालही हुसेन यांनी केला.

Story img Loader