इटलीत जी-७ शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील शपथविधीनंतर पहिल्याच परदेश दौऱ्यावर जात आहेत. या परिषदेसाठी ते इटलीला रवाना झाले आहेत. या परिषदेनिमित्त इटलीत जगभरातील दिग्गज नेत्यांचा मेळा जमला आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या स्वतः त्यांच्या देशात दाखल होणाऱ्या प्रत्येक नेत्याचं स्वागत करत आहेत. अशातच मेलोनी यांचा नेत्यांचं स्वागत करतानाचा व्हिडीओ भारतात व्हायरल होत आहे. कारण, जॉर्जिया मेलोनी इटलीत दाखल होणाऱ्या नेत्यांचं हात जोडून नमस्कार करून स्वागत करतानाचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये हस्तांदोलन करून स्वागत करण्याची परंपरा आहे. मात्र मेलोनी या भारतीय संस्कृतीप्रमाणे हात जोडून नमस्कार करताना दिसल्या.
जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्ज इटलीत दाखल होताच जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांचं स्वागत केलं. तसेच यावेळी मेलोनी यांनी स्कोल्ज यांना हात जोडून नमस्कार केला. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. तसेच भारतीय नागरिक मेलोनी यांचं कौतुक करत आहे. मेलोनी यांच्या कृतीतून भारतीय संस्कृतीची झलक पाहायला मिळाल्यामुळे भारतीयांकडून या व्हिडीओला पसंती मिळत आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, युरोपियन काऊन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल, जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्ज, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रो, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक इटलीत दाखल झाले आहेत. जॉर्जिया मेलोनी यांनी स्वतः या सर्वांचं स्वागत केलं.
हे ही वाचा >> विश्लेषण :इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी युरोपात इतक्या प्रभावी कशा? भारताशीही संबंध सुधारणार?
यावेळी जी ७ शिखर परिषदेत रशिया आणि युक्रेन युद्धावर चर्चा होण्याची शक्यता आहे. याबरोबरच इतर जागतिक विषयांवरील मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर या दौऱ्यावेळी एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही असण्याची शक्यता आहे. यामध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांचा समावेश असेल. या दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासह अनेक देशाच्या प्रमुखांबरोबर महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्याची शक्यता आहे.
इटलीत जी-७ परिषदेची लगबग, दुसरीकडे संसदेत खासदारांची एकमेकांना धक्काबुक्की
एकीकडे इटलीत जी-७ परिषदेची लगबग चालू आहे, तर दुसऱ्या बाजूला इटलीच्या संसदेत मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. इटलीच्या संसदेत काही सदारांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार पहायला मिळाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जी-७ शिखर परिषदेनिमित्त जगभरातील मोठ्या देशांचे प्रमुख इटलीत झाले आहेत. अशावेळी हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.