केरळमधील मच्छिमारांच्या हत्येतील आरोपी असलेल्या दोन नाविकांना इटलीने तातडीने भारत सरकारच्या हवाली करावे, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहावे, असा सज्जड इशारा पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी लोकसभेत बोलताना दिला. नाविकांना परत न पाठविण्याचा इटली सरकारचा निर्णय हा दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांच्या संकेतांचे उल्लंघन करणारा आहे, याकडे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात लक्ष वेधले.
इटलीच्या मॅसिमिलीआनो लॅटोर आणि सॅल्वाटोर गिरोन या दोन नाविकांना परत न पाठविण्याच्या इटली सरकारच्या निर्णयाचे पडसाद बुधवारी लोकसभेत उमटले. लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्षांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात हा विषय उपस्थित केला. त्यावर पंतप्रधानांनी स्वतः निवेदन केले. इटली सरकारच्या निर्णयाचा देशभर विरोध करण्यात येत असल्याचे सांगून डॉ. सिंग म्हणाले, हा निर्णय पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे. आम्ही मुत्सद्देगिरीच्या मार्गाने त्या दोन नाविकांना परत भारतात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. भारतातील इटलीच्या अधिकाऱयांनी सर्वोच्च न्यायालयाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा आदर त्यांनी केलाच पाहिजे. त्या दोन्ही नाविकांनी भारतात परत येऊन न्यायालयाच्या सुनावणीला उपस्थित राहिलेच पाहिजे.
राज्यसभेतही पंतप्रधानांनी याच स्वरुपाचे निवेदन केले.

Story img Loader