बॉलिवूडमधील सर्वच चित्रपटांमध्ये सध्या सर्रास दिसणारे आयटम सॉंग दूरचित्रवाहिन्यांवर यापुढे दिसणार नाहीत. आयटम सॉंग अल्पवयीन मुला-मुलींनी बघू नयेत, यासाठी ती दूरचित्रवाहिन्यांवर न दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सेन्सॉर बोर्डाने यासंदर्भात आपल्या सर्व विभागीय कार्यालयांना सूचना पाठविल्या आहेत. ज्या चित्रपटांमध्ये आयटम सॉंग आहेत, त्यांना ‘ए’ प्रमाणपत्र देण्यात येत असून, असे चित्रपट दूरचित्रवाहिन्यांवर दाखविताना त्यातून संबंधित गाणे वगळण्याची सूचना करण्यात आली आहे. दूरचित्रवाहिन्यांवर केवळ ‘यूए’ प्रमाणपत्र असलेले चित्रपटच पूर्णपणे दाखविण्यात यावेत, असेही या सूचनेत म्हटले आहे.
दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम कुटूंबातील सर्वजण पाहात असतात. त्यामुळे तिथे अश्लील दृश्ये असलेले चित्रपट आणि कार्यक्रम दाखविले जाऊ नयेत, यासाठी वरील सूचना करण्यात आल्या आहेत, असे सेन्सॉर बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पंकजा ठाकूर यांनी सांगितले. दिल्लीतील सामुहिक बलात्कार प्रकरणाशी या निर्णयाचा कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही महिन्यांपासून यासदंर्भात चर्चा सुरू होती. अनेक नागरिकांनी आम्हाला पत्र लिहून दूरचित्रवाहिन्यांवर ही गाणी दाखवू नयेत, अशी मागणी केली होती. राष्ट्रीय महिला आयोगानेही दोन आयटम सॉंगसंदर्भात आमच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळेच वरील सूचना करण्यात आल्या, असे ठाकूर यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

Story img Loader