CM Mamata Banerjee: मुस्लीम लीग किंवा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी माझा संबंध असल्याचे उघड केल्यास मी मुख्यमंत्रीपदावरून राजीनामा देईल, असे आव्हान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहे. विधानसभेत बोलत असताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “मी हिंदू धर्माचा अवमान केला, मुस्लीम लीगला पाठिंबा दिला, असा आरोप माझ्यावर केला जात आहे. मी आजवर खूप संघर्ष केला आहे. तरीही माझे जम्मू आणि काश्मीर व बांगलादेशमधील दहशतवाद्यांशी माझे संबंध असल्याचे ऐकावे लागत असेल तर मी पंतप्रधानांना पत्र लिहिते, दहशतवाद्यांशी असलेल्या संबंधाचा एक जरी पुरावा मिळाला तर मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईल.”
त्यापेक्षा मरण पत्करेन
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, “बंगालमध्ये कोणत्याही माफियाला थारा दिला जाणार नाही. दहशतवादी किंवा दंगेखोरांना इथे स्थान दिले जात नाही. दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप होण्यापेक्षा मी मरण पत्करेन.”
भाजपाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना सभागृहातून ३० दिवसांसाठी निलंबित केल्यानंतर त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप केले होते. सभागृहात अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाषण करत असताना ममता बॅनर्जी यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले. तसेच सुवेंदू अधिकारी यांचे निलंबन केल्यानंतर भाजपाच्या खासदारांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. त्यानंतर सरकारच्या वतीने अधिकारी यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाचा ठराव मांडला.
विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना उद्देशन ममता बॅनर्जी म्हणाल्या, तुम्ही सभागृहाच्या बाहेर काय म्हणालात, हे मी ऐकले. हिंदुत्वाबद्दल बोलल्यामुळे तुम्हाला निलंबित केल्याचे म्हणालात. तुम्ही कधीपासून हिंदुत्ववादी नेते बनलात? तुम्ही देशाचे तुकडे करण्यासाठी धर्माचे बाजारीकरण करत आहात. बंगालमध्ये लोकशाही असून प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. पण धर्माच्या नावावर आम्ही देशाचे विभाजन होऊ देणार नाही.