लेखक सलमान रश्दी यांच्यावरील हल्ल्यानंतर आता जगप्रसिद्ध लेखिका जे के रोलिंग यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रश्दी यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी ट्वीट केले होते. या ट्वीटला उत्तर म्हणून एका ट्विटर युजरने घाबरू नका यानंतर तुमचा नंबर आहे, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. जे के रोलिंग यांनी धमकी देणाऱ्या या संदेशाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. जे के रोलिंग हॅरी पॉटर या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका आहेत.
हेही वाचा >> भारताचे ‘वॉरन बफे’ अशी ओळख असलेल्या राकेश झुनझुनवालांचे निधन
जे के रोलिंग यांनी सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करणारे ट्वीट केले होते. तसेच रश्दी लवकरच बरे व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली होती. याच ट्वीटला उत्तर म्हणून एका ट्विटर वापरकर्त्याने घाबरू नका यानंतर तुमचाच नंबर आहे, असे ट्वीट केले. ज्या ट्विटर खात्यावरून रोलिंग यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, त्याच खात्यावरून रश्दी यांच्यावर हल्ला करणाऱ्या हादी मातर या हल्लेखोराचे कौतुक करण्यात आलेले आहे. रश्दी यांच्यावरील हल्ल्यानंतर आता जे के रोलिंग यांना धमकीचा संदेश मिळाल्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय.
हेही वाचा >> भारताने आक्षेप घेतलेल्या चिनी जहाजाला अखेर श्रीलंकेची परवानगी
शुक्रवारी पश्चिम न्यूयॉर्कमधील साहित्य विषय़क कार्यक्रमादरम्यान रश्दी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या यकृताला इजा पोहोचली असून त्यांना एका डोळादेखील गमावावा लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >> देशभर उत्साहरंग; ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेला दिमाखात प्रारंभ, शोभायात्रांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन
दरम्यान हादी मातर या हल्लेखोराविरोधात हत्येचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यूयॉर्क पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. रश्दी यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकावर भारतासह इराण तसेच काही मुस्लीम राष्ट्रांमध्ये बंदी आहे. या पुस्तकात ईशनिंदा करण्यात आल्याचा आरोप आहे.