काश्मीरच्या दोदा जिल्ह्यातील एका पोलीस चौकीवर काही अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन विशेष पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. दोदा जिल्ह्याच्या डोंगराळ भागात असणाऱ्या या चौकीवर आज पहाटेच्या सुमारास हल्ला झाला. किकर सिंग आणि मोहम्मद युनुस अशी जखमी झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. यापैकी किकर सिंग यांच्या मानेत तर मोहम्मद युनुस यांच्या पोटात गोळी लागली आहे. या दोघांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, हा हल्ला नेमका कसा झाला याबद्दल स्थानिक पोलिसांकडून गुप्तता बाळगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तंटा गावात असणाऱ्या या चौकीबाहेर एके-४७ रायफलने गोळीबार करण्यात आला. रात्री पावणेदोनच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी चौकीतील पोलिसांना अचानक झालेल्या हल्ल्यातून सावरण्यासाठी वेळच मिळाला नाही.

गेल्या सात वर्षांत एकही दहशतवादी कारवाई न झाल्यामुळे दोदाला २०१० मध्ये दहशवादमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले होते. या परिसरातील अनेक गावांमध्ये स्थानिकांची सुरक्षा पथके तयार करण्यात आली आहेत. मात्र, यापैकी कोणाकडेही एके-४७ रायफल नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये बँका लुटण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे जम्मू अॅण्ड काश्मीर बँकेने आपल्या शाखांमधील रोखीचे व्यवहार थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बँकेच्या ४० शाखांमधील व्यवहार ठप्प झाले आहेत. गेल्या सहा महिन्यात काश्मीरमध्ये बँकेवर १३ वेळा हल्ला करण्यात आला असून तब्बल ९२ लाखांची रोकड लुटून नेण्यात आली आहे. यापैकी चार घटना या महिन्याच्या सुरूवातीलाच घडल्या आहेत.

Story img Loader