अयोध्येत मंदिराचं बांधकाम सुरू झाल्यानंतर काशी आणि मथुरेतही मंदिर उभारणीची चर्चा सुरू झाली आहे. या दोन्ही ठिकाणच्या मशिदींचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यासंदर्भात वेगळे दावे आणि घोषवाक्ये चर्चेत आली आहेत. त्याबाबत राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. यावर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना विचारणा केली असता काशी किंवा मथुरेमध्ये मंदिर उभारणीचं भाजपाचं कोणतंही नियोजन नसल्याचं भाष्य त्यांनी केलं आहे. तसेच, अनेकांकडून यासंदर्भात भावनिक दावे केले जात असल्याचंही ते म्हणाले आहेत.
जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या सविस्तर मुलाखतीमध्ये अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. काशी-मथुरेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. तसेच, या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी केलेल्या दाव्यांबाबत विचारणा केली असता त्यावरही जे. पी. नड्डा यांनी त्यांचं स्पष्ट मत व्यक्त केलं.
काशी-मथुरेबाबत काय म्हणाले जे. पी. नड्डा?
नड्डांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पूर्ण लक्ष्य हे विकासाच्या मुद्द्यांवर असल्याचं नमूद केलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीब, शोषित, दलित, महिला, तरुण, शेतकरी आणि मागास वर्गावर पक्षाचं लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना अतिरिक्त बळ देण्याची गरज आहे. आपण त्यांना सक्षम करायलाच हवं”, असं जे. पी. नड्डा यावेळी म्हणाले.
काशी-मथुरेतील वादग्रस्त जागेसंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, “वादग्रस्त ठिकाणी मंदिर बांधण्याची कोणतीही कल्पना, नियोजन किंवा इच्छा भारतीय जनता पक्षाची नाही. यावर पक्षात कोणती चर्चाही नाही. पक्षाच्या विचारसरणीनुसार आमचं पक्षातली व्यवस्था निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानुसार आधी पक्षाच्या संसदीय समितीमध्ये चर्चा होते. त्यानंतर प्रस्ताव राष्ट्रीय कौन्सिलकडे जातो, तिथे त्याला मंजुरी मिळते.”
योगी आदित्यनाथ-हिमंता बिस्व सरमांच्या विधानांचं काय?
काशी व मथुरेमध्ये मंदिर बांधण्यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी प्रचारसभांमधून केलेल्या दाव्यांबाबत नड्डा यांना विचारणा करण्यात आली. त्यांनी हे दावे फेटाळून लावले. “यासंदर्भात कोणताही संभ्रम नाही. भाजपानं जून १९८९ च्या पालमपूर प्रस्तावामध्येच राम मंदिराचा मुद्दा समाविष्ट केला होता. बराच संघर्ष केल्यानंतर राम मंदिर अस्तित्वात आलं. ते आमच्या अजेंड्यावर होतं. काही लोक भावनिक होतात किंवा उत्साहात इतर मुद्द्यांवर बोलतात. आमचा मोठा पक्ष आहे. प्रत्येक नेत्याची बोलण्याची वेगळी पद्धत आहे”, असं जे. पी. नड्डा यावेळी म्हणाले.