भारतीय संघाचा क्रिकेटपटू रविंद्र जाडेजाची पत्नी रिवाबाची गुजरातच्या करणी सेनेच्या महिला प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये करणी सेनेचा विशेष जोर आहे, दिपीका पदुकोणच्या पद्मावत सिनेमालाही करणी सेनेने जोरदार विरोध केला होता.
करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महिपालसिंह मकराणा यांनी रिवाबाची महिला विभाग अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. हे पद स्विकारण्यापूर्वी आपण आपला पती रविंद्र जाडेजाशी याविषयी चर्चा केल्याचंही रिवाबाने स्पष्ट केलं आहे. समाजासाठी चांगलं काम करण्याची संधी मला मिळते आहे, या कामामधून मी एक चांगला आदर्श निर्माण करु शकते. त्यामुळे रविंद्रने मला यासाठी पाठींबा दिल्याचंही रिवाबा म्हणाली.
गुजरातच्या ग्रामीण भागातील महिलांचं सबलीकरण करुन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं हे आपलं प्रमुख उद्दीष्ट असल्याचं रिवाबाने स्पष्ट केलं. “प्रत्येक महिला स्वतःच्या पायावर उभी राहुन कमावती झाल्यास ती कोणत्याही संकटाचा सामना करु शकते.” रिवाबा मेकॅनिकल इंजिनीअर असून 2016 साली रविंद्र जाडेजासोबत तिचं लग्न झालं. रविंद्र व रिवाबाला एक छोटी मुलगीही आहे.